चिंताजनक ः अमळनेरात कोरोना रुग्ण दोनशेपार... तरीही नागरिक बिनधास्त

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 11 June 2020

अमळनेर शहरासह तालुक्यात चार वेळा जनता कर्फ्यू लावण्यात आला होता. मात्र, ही स्थिती तेवढ्यापुरता सीमित होती. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे सुरूच ठेवल्याने कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यातच आता ग्रामीण भागातील कावपिंप्री, शिरूड, शहापूर आदी ठिकाणीही कोरोनाचा शिरकाव झाल्याने ग्रामीण भागात चिंता वाढली आहे.

अमळनेर ः शहरापाठोपाठ आता कोरोनाने ग्रामीण भागातही शिरकाव केला आहे. प्रशासन चांगलेच हादरले असून, यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याची गरज आहे. कोरोनाची रुग्ण संख्या दोनशेपार झाली असून, तालुकावासीयांची चिंता वाढली आहे. 
जिल्ह्यासह अमळनेरात कोरोनाची स्थिती गंभीर असतानाही नागरिकांना गांभीर्य नसल्याचे दिसून येते. शहरासह तालुक्यात चार वेळा जनता कर्फ्यू लावण्यात आला होता. मात्र, ही स्थिती तेवढ्यापुरता सीमित होती. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे सुरूच ठेवल्याने कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यातच आता ग्रामीण भागातील कावपिंप्री, शिरूड, शहापूर आदी ठिकाणीही कोरोनाचा शिरकाव झाल्याने ग्रामीण भागात चिंता वाढली आहे. कोरोनाला अटकाव करण्यासाठी प्रशासनही युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. मात्र, नागरिकच बिनधास्त असल्याने प्रशासन, लोकप्रतिनिधी हतबल झाले आहे. यासाठी आता नागरिकांनीच स्वतःची काळजी घेऊन बचाव करणे गरजेचे आहे. विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे. 

बाजारपेठांतील गर्दी चिंताजनक 
राज्यात काहीशी शिथिलता मिळाल्याने शहरासह तालुक्यातही सर्व व्यवहार खुले झाले आहेत. मात्र, त्यातही शासनाने अटी व नियमांच्या अधीन राहून दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र, सर्व नियम धाब्यावर बसवून काही व्यावसायिक बिनधास्तपणे दुकाने खुली ठेवताना दिसून येतात. बाजारपेठेत सर्वच दुकाने आता पूर्ववत सुरू झाल्याने गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दुकानांवर रांगाही लागल्याचे दिसून येते. फिजिकल डिस्टन्सिंग, तसेच अनेक जण मास्कचाही वापर करत नसल्याने कोरोनाची संख्या वाढतच जाणार असल्याची चिन्हे आहेत. 

ग्रामीण भाग सील करावा
अमळनेर शहरात बाजारासाठी मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील नागरिक गर्दी करू लागले आहेत. परिणामी कोरोनाने ग्रामीण भागातही शिरकाव केला. ग्रामीण भागातच अत्यावश्‍यक सेवा पुरविणे गरजेचे आहे. तसेच गावागावांमध्ये पुन्हा बंदिस्त केल्यास त्यास अटकाव शक्य आहे. मात्र, अनेक खासगी प्रवासी वाहतूक करणारे चारचाकी वाहनेही प्रवाशांना घेऊन शहरात दाखल होत असल्याचे चित्र आहे. यासाठी प्रशासनाने आता तालुकांतर्गत ग्रामीण भागाच्या सिमाही बंद करण्याची गरज आहे. 

परिसर निहाय रूग्णसंख्या....
झामी चौक ४०, वाणी मंगल कार्यालय ०२, अमलेश्‍वर नगर ५५, बोरसे गल्ली ३५, सराफ बाजार २८, प्रताप नगर ०२, तांबेपुरा ०३, पैलाड ०३, भोईवाडा ०२, वाडी चौक ०६, शिवशक्‍ती चौक ०४, आर. के. नगर ०४, गुलमोहर कॉलनी ०१, त्रिकोणी बगिचा ०३, सिंधी कॉलनी ०२, धुळे रोड ०३, फरशी रोड ०१, मिलचाळ ०१, कावपिंप्री ०३, पाच कंदील ०१, भांडारकर कंपाऊंड ०१, शहापूर ०१.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news corona; Amalner Corona patient two hundred