अन्‌ जिल्हाधिकारी गेले थेट कोरोना कक्षात; साधला बाधितांशी संवाद

सकाळ वृत्तसेवा
Friday, 29 May 2020

रुग्णांना डिस्चार्ज दिल्यानंतर जिल्हाधिकारी यादव यांनी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांशी संवाद साधावयाचा असल्याची इच्छा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल पाटील यांच्याकडे बोलून दाखविली. त्यानुसार डॉ. पाटील यांनी पीपीई किट घालून आपल्याला संवाद साधता येईल, असे सांगितले.

धुळे : "कोरोना'चा संसर्ग झालेला रुग्ण योग्य वेळी वैद्यकीय उपचार मिळाल्याने निश्‍चितच बरा होतो. या रुग्णांवर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी अहोरात्र उपचार करीत आहेत. त्यांच्यासह "कोरोना' पॉझिटिव्ह रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांचे मनोधैर्य उंचावून मानवी मूल्यांची जोपासना, संवर्धन व्हावे म्हणूनच आपण आज सकाळी "पीपीई किट' घालून कोरोना विलगीकरण कक्षात जाऊन "कोरोना' पॉझिटिव्ह रुग्णांशी संवाद साधला, असे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी सांगितले. 
"कोरोना'पासून मुक्त झालेल्या चार रुग्णांना डिस्चार्ज देण्यासाठी जिल्हाधिकारी यादव आज जिल्हा सामान्य रुग्णालय अर्थात डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये उपस्थित होते. या रुग्णांना डिस्चार्ज दिल्यानंतर जिल्हाधिकारी यादव यांनी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांशी संवाद साधावयाचा असल्याची इच्छा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल पाटील यांच्याकडे बोलून दाखविली. त्यानुसार डॉ. पाटील यांनी पीपीई किट घालून आपल्याला संवाद साधता येईल, असे सांगितले. त्यानंतर जिल्हाधिकारी यादव, डॉ. पाटील यांनी पीपीई किट घालून कोरोना विलगीकरण कक्षात प्रवेश केला. तेथे जिल्हाधिकारी यादव यांनी रुग्णांशी संवाद साधत आवश्‍यक सोयी सुविधा मिळतात का?, वेळेवर औषधोपचार होतो का?, भोजन चांगले मिळते का, अशी विचारणा करीत काळजी घेण्याचे आवाहन केले. 
जिल्हाधिकारी यादव यांनी सांगितले, की कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यावर नागरिक आणि त्यांच्या नातेवाइकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. रुग्णांवर वेळेत औषधोपचार झाल्यास ते निश्‍चित बरे होतात. या रुग्णांना सहानुभूतीची नव्हे, तर सौजन्याची आवश्‍यकता आहे. त्यामुळे नागरिकांनी आजाराची माहिती लपवून न ठेवता तातडीने रुग्णालयात औषधोपचार घ्यावेत. आगामी काळात भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयास भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले. कक्षातून बाहेर आल्यावर जिल्हाधिकारी यादव, डॉ. पाटील यांना सॅनिटायझ करण्यात आले. 

सामाजिक मूल्यांचे संवर्धन व्हावे 
जिल्हाधिकारी यादव म्हणाले, की मानवी मूल्यांबरोबरच सामाजिक मूल्यांचे संवर्धन होण्याची आवश्‍यकता आहे. संकटाच्या कालावधीत या मूल्यांची खरी ओळख होते. काही वेळा नातेवाईकही कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांचे मृतदेह नाकारत आहेत. ही खेदाची बाब आहे. योग्य दक्षता घेतल्यास कोरोनाचा संसर्ग होत नाही, हे आपल्याला दाखवून द्यावयाचे होते. त्यामुळेच आपण आज स्वतः पीपीई किट घालून रुग्णांशी संवाद साधला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule collector ppe kit and covid center patients tolk