म्‍हणूनच उत्तर महाराष्ट्र मुख्यमंत्रिपदापासून वंचित : एकनाथ खडसे  

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 31 October 2020

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर श्री. खडसे शनिवारी (ता. ३१) प्रथमच धुळेमार्गे जळगावला गेले. त्यांची मुकटी (ता. धुळे) येथे रात्री उशिरा सभा झाली.

धुळे : उत्तर महाराष्ट्रातील जनता आक्रमक नसल्यानेच हा विभाग मुख्यमंत्रिपदापासून वंचित राहिला आहे. शिवाय या विभागात जेथे-जेथे नेतृत्व पुढे आले त्यांचे वरती खच्चीकरणच झाल्याचे वाटते. त्यामुळे उत्तर महाराष्ट्राच्या विकासाची भूक पूर्ण होऊ शकली नाही. ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल, असे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले. 
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर श्री. खडसे शनिवारी (ता. ३१) प्रथमच धुळेमार्गे जळगावला गेले. त्यांची मुकटी (ता. धुळे) येथे रात्री उशिरा सभा झाली. सरपंच गुलाबराव पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, सुनील नेरकर, माजी जिल्हाध्यक्ष किरण पाटील, तालुकाध्यक्ष राजेंद्र चितोडकर, महिला जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा, विकास सोसायटीचे अध्यक्ष डॉ. राहुल कुवर, राजेंद्र शर्मा, दीपक साळुंखे, हरी पाटील, चुनीलाल पाटील, भिरडाणेचे सरपंच राजू पाटील, सर्जेराव देवरे, अमोल शर्मा, एकनाथ पाटील, शंकरराव पाटील, राहुल पाटील आदी उपस्थित होते. 

प्रकल्प मार्गी लावणार 
श्री. खडसे म्हणाले, की १९९५ ला स्वत: पुढाकार घेऊन तापी विकास महामंडळाची स्थापना केली. तापी नदीवर बॅरेज झाले. मात्र, पाणी तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोचले नाही. त्यासाठी उपसा सिंचन योजना मंजुरीसाठी प्रयत्न केले. साक्रीतील पांझरा कान साखर कारखाना बंद आहे. असे उत्तर महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प मार्गी लावायचे आहेत. भाजपमध्ये खासदार डॉ. सुभाष भामरे, माजी मंत्री जयकुमार रावल, डॉ. विजयकुमार गावित, खासदार डॉ. हीना गावित यांना आणले. अन्यथा, भाजपमध्ये होते कोण? भाजपला मी बहुजन चेहऱ्याची ओळख दिली. तरीही आपल्यात कुणी मोठा होऊ नये, असे हीन, किळसवाणे प्रयत्न झाले. भाजपमध्ये ४० वर्षे काम करताना थकलो. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र थकणार नाही. हाच पक्ष राज्यासह उत्तर महाराष्ट्राच्या विकासाची आस पूर्ण करू शकतो, असा दृढ विश्‍वास आहे. 

उत्तर महाराष्ट्रावर अन्याय 
उत्तर महाराष्ट्रात क्षमता नाही का? तर आहे, असे सांगत श्री. खडसे म्हणाले, की विकासात धुळे जिल्ह्यासह खानदेश पुढे गेला नाही. यात ठिकठिकाणाहून जे-जे नेतृत्व आले, त्यांचे वरती खच्चीकरण झाले, असे वाटते. माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी खूप काम केले. ते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत गेले. भाऊसाहेब हिरे यांनीही कामे केली, तेही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत गेले. मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत गेलो; पण कुणालाही न्याय मिळाला नाही. उत्तर महाराष्ट्र कायम मुख्यमंत्रिपदापासून वंचित राहिला. मग या विभागाने काही गुन्हा केला का?, तर नाही. गुन्हा या विभागाचा नाही, तर तुमचा म्हणजे जनतेचा आहे. आपण मुख्यमंत्रिपदाची मागणी करत नाही. आपण फारच वारकरी, सहनशील आहोत. त्यामुळे अन्याय सहन करतो. माझा भाजपमध्ये गेली चार वर्षे छळ झाला. त्यामुळे त्यांना जनतेने जागा दाखवावी, असे आवाहन श्री. खडसे यांनी केले. प्राचार्य ईश्‍वर बडगुजर यांनी प्रास्ताविक केले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule eknath khadse statement no cm uttar maharashtra