स्वच्छतेसह पाणी अन्‌ वेळेवर नाश्‍ता- जेवण मिळावे 

निखिल सूर्यवंशी
Friday, 29 May 2020

रुग्ण किंवा संशयिताने पळून जाणे, अस्वच्छता, पिण्याचे पाणी, वेळेवर नाश्‍ता, जेवण व या संदर्भात अपेक्षांकडे लक्ष दिले जात नसल्याने अकारण हिरे महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्रतिमेला धक्का बसत आहे.

धुळे : खरे तर मार्चच्या प्रारंभापासून येथील चक्करबर्डीतील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न जिल्हा सर्वोपचार रुग्णालय संसर्गजन्य कोरोना विषाणूशी अहोरात्र, अथक मुकाबला करत आहे. रुग्णांवर उपचारांसाठी झटत आहे. अंतर्गत अनेक अडचणी, समस्या व संकटांशी सामना करत डॉक्‍टर, कर्मचारी रुग्णसेवा देत आहेत. त्यांच्या या कार्याला खरोखर तोड नाही. त्यांच्याविषयीची कृतज्ञता शब्दांत व्यक्तच होऊ शकत नाही. मात्र, रुग्ण किंवा संशयिताने पळून जाणे, अस्वच्छता, पिण्याचे पाणी, वेळेवर नाश्‍ता, जेवण व या संदर्भात अपेक्षांकडे लक्ष दिले जात नसल्याने अकारण हिरे महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्रतिमेला धक्का बसत आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांवर टीकेच्या माध्यमातून वरवंटा फिरविला जात असल्याचे दिसते. ते जाणून नवनियुक्त अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी अंतर्गत व्यवस्था सुधारण्याची नितांत गरज व्यक्त होत आहे. 
एकीकडे मुंबई, ठाणे आदी विविध भागांतून मूळ गावी जाण्यासाठी, पोटापाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी हजारो परप्रांतीय मजूर जीव टांगणीला लावत, उन्हाचे चटके सोसत, उपाशीतापाशी पायपीट करत जाताना सर्वांनी पाहिले. दुसरीकडे शासनाच्या विविध सोयीसुविधा, चांगले वेतन, "कोरोना'शी मुकाबला करताना संरक्षक साधने असताना हिरे महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयातील "ते' कर्मचारी आपापली जबाबदारी यथायोग्य पार पाडत नसतील तर नाहक टीकेला सामोरे जाण्याची वेळ त्यांची संस्था आणि जिल्ह्यावर येत आहे. हे वास्तव आहे. अशा कर्मचाऱ्यांच्याही काही अडचणी, समस्या असतील. पण त्यांनी त्या मनमोकळेपणाने अधिष्ठात्यांपुढे मांडल्या पाहिजेत. जनहितासाठी त्यांच्या कर्मचारी संघटनेने मार्ग काढण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. तसे होताना दिसत नाही. 

मनोधैर्य टिकवून ठेवावे 
जिल्ह्यालगत शिवसेनेचे कृषिमंत्री दादा भुसे, जिल्हाधिकारी संजय यादव यांनी आज संरक्षक "पीपीई किट' परिधान करून रुग्णालयातील कोरोनाग्रस्त रुग्णांशी संवाद साधला. त्यातून त्यांनी या आजाराशी मुकाबला करताना कुणीही घाबरण्याचे कारण नाही, असा संदेश जनतेला दिला. ते लक्षात घेत जनतेचे रक्षक असलेले हिरे महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मनोधैर्य टिकवून ठेवण्याची गरज व्यक्त होते. तसे पाहिले तर रुग्णालयात दाखल रुग्ण किंवा संशयितांची उपचारासह वेळेवर नाश्‍ता, जेवण, स्वच्छता, पिण्यासाठी पाणी मिळावे इतकी साधी अपेक्षा आहे. इतर त्यांना काहीही नको. परंतु, या बारीकसारीक, छोट्या गोष्टींची पूर्तता वेळेत होत नसल्याने अहोरात्र, अथक "कोरोना'शी मुकाबला करणारे हिरे महाविद्यालय व जिल्हा सर्वोपचार रुग्णालय टीकेला सामोरे जात आहे. परिणामी, वैद्यकीय यंत्रणेचे विविध पातळीवरून अनिच्छेने वाभाडे काढले जात आहेत. ते प्रतिमेला धक्का देणारे आहेत. 

कामे टाळणाऱ्यांवर वठणीवर आणा 
या पार्श्‍वभूमीवर नवनियुक्त अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी कार्यक्षेत्रात तत्काळ सर्वसमावेशक बैठक बोलावून रुग्णांच्या अपेक्षा आणि कर्मचाऱ्यांची तत्परता आदी संबंधित प्रश्‍नांवर मार्ग काढण्याची गरज आहे. बरेच कर्मचारी वयस्कर, निवृत्तीला आलेले आणि काही संघटने आड लपून जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करत असतील, तर ते अडचणीचे ठरू शकते. अशा वेळी वयस्कर कर्मचारी व होतकरू कर्मचारी, अशी वर्गवारी करून जबाबदारीचे वाटप झाले, तर बरेच प्रश्‍न सुटू शकतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule medical collage corona patients no time water and lunch