धुळेः बतावणीतून लूटणारी इराणी टोळी गजाआड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धुळेः बतावणीतून लूटणारी इराणी टोळी गजाआड

धुळेः बतावणीतून लूटणारी इराणी टोळी गजाआड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवाधुळे : अस्खलित मराठीतून संवाद, वैशिष्टपूर्ण पेहरावातून पोलिस वा सीबीआय(CBI), क्राईम ब्रँचचे (Crime Branch) अधिकारी असल्याची बतावणी आणि वाहनांच्या अदलाबदलीतून पोलिसांचीही दिशाभूल करणारी इराणी टोळी (Iranian gang) येथील स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेला (Local Crime Investigation Branch) मात्र चकवा देऊ शकली नाही. जिल्ह्यात ठिकठिकाणी इराणी टोळीने काही व्यक्तींना लूबाडणुकीचा उद्योग केल्यानंतर एलसीबीने माग काढण्यास सुरवात केली आणि त्यात यश मिळाल्यावर संशयित चौघांना गजाआड केले.

हेही वाचा: जळगावः गिरणा धरणातून रब्बी हंगामासाठी पाणी सुटणार


या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी धुळेकरांना सावधानतेसह जागरूकतेचा सल्ला दिला आहे. पोलिस यंत्रणेने उकल केलेल्या विविध गुन्ह्यांची श्री. पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, एलसीबीचे निरीक्षक शिवाजी बुधवंत आणि विविध पोलिस ठाण्याचे अधिकारी उपस्थित होते. इराणी टोळीने दिवाळीत पुन्हा जिल्ह्यात शिरकाव केला. तिने निजामपूर, दोंडाईचात ज्येष्ठ नागरिकांची लुबाडणूक केली.


अशी केली फसवणूक
दागिने काढून सुरक्षित ठेवा, असे संबंधित व्यक्तींना सांगत चलाखीने लूटमार केली. संबंधित सराईत गुन्हेगारांनी जिल्ह्यात पाच ठिकाणी गुन्हे केले. मुडी येथील ६५ वर्षीय वृद्धेला क्राईम ब्रँचचे अधिकारी, जूनमध्ये धुळे शहरातील नेहरू चौकात ७२ वर्षीय वृद्धेला सीबीआयची धाड पडली, ऑक्टोबरमध्ये दसैरा मैदानाजवळ ७८ वर्षीय वृद्ध, नोव्हेंबरमध्ये दोंडाईचा आणि नंदुरबार येथे गुन्हेगारांनी पोलिस असल्याची बतावणीतून लूटमार केली. श्री. पाटील यांच्या सूचनेनुसार या गुन्ह्यातील घटनाक्रम, तांत्रिक बाबी बारकाईने तपासत एलसीबीने टोळीला गजाआड केले. लुबाडणुकीवेळी दुचाकीचा वापर, पुढे गेल्यावर कारमधील व्यक्ती दुचाकीवर, तर दुचाकीवरील व्यक्ती कारमध्ये, अशी दिशाभूल करून ही टोळी गुन्हे करत होती.

पाच गुन्ह्यांची कबुली
धुळे शहरात सोमवारी (ता.१५) इराणी टोळी दाखल झाल्याची माहिती एलसीबीला मिळाली. त्यानुसार पथकाने चाळीसगाव चौफुलीवर सापळा रचला आणि स्कॉर्पिओमधील संशयित चौघांना ताब्यात घेतले. त्यांनी जिल्ह्यातील पाचही गुन्ह्यांची कबुली दिली. या टोळीने नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी ६० गुन्हे केले आहेत. अभ्यासाअंती टोळीवर मोक्का लावण्याचा प्रयत्न करू, असे पोलिस अधीक्षक पाटील यांनी सांगितले. पथकाने अकबर शेरखान पठाण, राज महम्मद मुनवर अली, आयुब ऊर्फ भुऱ्या फय्याज शेख (तिघे रा. इराणी मोहल्ला श्रीरामपूर, जि. नगर), असदुल्ला फय्याज खान (रा. कल्याण) आणि शेख इम्रान अब्दुल सलाम (रा. मालेगाव) यांना अटक केली. त्यांच्याकडून एक लाख २५ हजार किमतीचे सोन्याचे दागिने, सात मोबाईल, पाच लाख किमतीची स्कार्पिओ (एचआर ८० डी ३९८२), पल्सर (एमएच १५ एचबी ८६८३), युनिकॉर्न (एमएच ४१ डब्ल्यू १७४), कॅप, १४ हात रूमाल, १२ मास्क, कटर, असा एकूण सात लाख २६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

हेही वाचा: जळगाव : पीडिताने वाचला अत्याचाराचा पाढा


टोळीवर असे गुन्हे दाखल...
महाराष्ट्रासह गुजरातमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या इराणी टोळीतील अकबर पठाण विरुद्ध २५, असदुल्ला खान याच्याविरूद्ध १६, आयुब इराणी याच्याविरुद्धही १६, तर इम्रान शेख विरोधात एक गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिस अधीक्षकांनी दिली. येथे श्री. पाटील, श्री. बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. बुधवंत, सहाय्यक निरीक्षक प्रकाश पाटील, उपनिरीक्षक योगेश राऊत, बाळासाहेब सूर्यवंशी, संजय पाटील, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, प्रकाश सोनार, संदीप सरग, योगेश चव्हाण, चेतन कंखरे, सुनील पाटील, मयूर पाटील, तुषार पारधी, श्रीशैल जाधव, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी, महेंद्र सपकाळ, मनोज महाजन यांनी कारवाई केली.

loading image
go to top