कमकुवत पुल देतोय मृत्यूला आमंत्रण...डागडुजी करून काम चलाव 

दीपक कच्छवा
Thursday, 20 August 2020

धुळे चाळीसगाव मार्गावर मेहूबणारे येथे गिरणा नदीवर सन 1970 साली पूल बांधण्यात आलेला आहे. या पुलाला आज 50 वर्ष झाले. या पुलाची उंची नदी पात्रापासुन सुमारे तेरा मीटर उंच आहे. पुलाचे अँगल देखील खालून कमकुवत झाले असून उघडे पडले आहेत.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) ः धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गवरील मेहुणबारे येथील गिरणा नदीवरील पूल धोकेदायक स्थितीत आला आहे. केवळ थातूरमातुर कामावर या पुलाची वर्षोनुवर्षे बोळवण केली जात आहे. पुलाचे कठडे बऱ्याच ठिकाणी तुटलेले असल्याने हा पुल धोकादायक बनला असून या पुलावरून चालतांना भीती वाटत असते. निव्वळ डागडुजीचा हा बागुलबुवा किती दिवस चालणार असा प्रश्न वाहनधारकांकडून होत आहे. 

धुळे चाळीसगाव मार्गावर मेहूबणारे येथे गिरणा नदीवर सन 1970 साली पूल बांधण्यात आलेला आहे. या पुलाला आज 50 वर्ष झाले. या पुलाची उंची नदी पात्रापासुन सुमारे तेरा मीटर उंच आहे. पुलाचे अँगल देखील खालून कमकुवत झाले असून उघडे पडले आहेत. मध्यंतरी या पुलाच्या उघड्या पडलेल्या ऍगंलची थातूरमातूर डागडुजी करण्यात आली आहे. हा पुल झाल्यापासुन ते आज पर्यंत कुठलीच पाहिजे तशी दुरूस्ती झालेली नाही.पावसाळ्याच्या तोंडावर पुलावर पडलेले खड्डे थातूरमातूर डांबरी करण करून तेवढी बोळवण केली जाते.काही दिवसांनी हे खड्डे जैसे थे होतात. 

वाहन चालकांमध्ये भिती 
चाळीसगाव धुळे महामार्गची गेल्या काही वर्षापासून वाट लागली आहे. धुळे ते सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 ची सोलापूर पासून ते औरंगाबादपर्यत बहुताश ठिकाणी चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. तसेच कन्नड तालुका हद्दीतील कन्नड घाट ते औरंगाबाद पर्यंतही काम प्रगती पथावर आहे. मात्र नेमके कन्नड घाट बोढरे फाटा ते धुळे 62 किमीच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या तीन वर्षापासून रखडले आहे. त्याचा फटका देखील मेहूणबारे येथील गिरणा पुलाला बसत आहे.गत वर्षी या मार्गाची डागडुजी करण्यात आली.या दुरूस्तीच्या वेळी पुलाची दुरूस्ती करण्यात आलेली नाही. भविष्यात महाडच्या सावित्री पुलासारखी गत होवू नये म्हणजे झाले.अत्यंत महत्वाच पूल असून देखील या पुलाच्या दुरुस्तीकडे बेपवाईने पाहिले जात आहे,दोन वर्षापूर्वी या गिरणा पुलावरून भरधाव ट्रक पुलाचा कठडे तोडुन नदीत पडला होता. यात एकाचा मृत्यू झाला होता.त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा एक ट्रक कठड्यातच अडकल्याने तो नदीपाञात कोसळला नाही. तेव्हापासून पुलाचे कठडे तुटलेल्या अवस्थेत आहे. या पुलावरून दररोज हजारो वाहने धावत असतात. दक्षिण आणि उत्तर भारतात जण्यासाठी हा अत्यंत सोईचा मार्ग असल्याने अनेक अवजड वाहने या महामार्गावरून धावतात. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची नजर या पुलाकडे जात नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.पुलवरील कठड्यांची झालेल्या दुरावस्थेमुळे आणखी एखादा भिषण अपघात झाल्याशिवाय राहणार नाही. या पुलावरून चालतानां वाहन धारकांना अक्षरशा जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे.इतकी या पुलाची भयानक अवस्था झाली आहे. 

दुरूस्तीचा मुहुर्त कधी? 
दोन वर्षापूर्वी मुंबई येथील छत्रपती शिवाजी टर्मिनस जवळील हिमालय पादचारी पुल कोसळून सहा जणांचा बळी गेल्याने पुन्हा राज्यातील जीर्ण पुलांचा प्रश्न एैरणीवर आला होता. त्यानंतर महाड येथील सावित्री नदीवरील पूलही कोसळून मोठी जीवीत हानी झाली होती. या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व पुलांचे स्ट्‍र्नचर ऑडीटही करण्यात आले होते.मात्र या ऑडीटचे पुढे काय झाले हा प्रश्न गुलदस्त्यात आहे. धुळे-चाळीसगाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211वरील मेहूणबारे जवळील गिरणा नदीवरील पुल अक्षरशा धोकेदायक बनल आहे. या पुलाचे स्ट्रक्‍चर ऑडीट कधी होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या पुलाची अवस्था धोकादायक असूनही केवळ डागडुजीवर किती दिवस भागणवणार? असा सवाल होत असून दुरूस्तीचा मुहूर्तच सापडत नसल्याने मुंबई, महाडसारखी दुर्घटना घडल्यावर संबंधीत यंत्रणेला जाग येईल काय अश्‍या संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहे. 

संपादन : राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule solapur national highway brige damage no repaire