
वाळूची टंचाई निर्माण करून जादा दराने विक्री करून ग्राहकांची लूट केली जात आहे. वाळूमाफियांचे दलाल दिवसभर महसूल कार्यालय परिसरात फिरत असल्यामुळे नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.
एरंडोल : तालुक्यात महसूल प्रशासनाच्या नाकावर टिच्चून वाळूची चोरट्या मार्गाने खुलेआम वाहतूक सुरू आहे. वाळूमाफियांवर कारवाई करण्यास व वाळूचोरी रोखण्यात स्थानिक महसूल प्रशासन अपयशी ठरले असून, जिल्हाधिकाऱ्यांनीच याकडे लक्ष घालून वाळूमाफियांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. रात्रभर वाळूची वाहतूक सुरू असताना महसूल कर्मचारी व अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आवश्य वाचा- सोबत कोणीच नसल्यामुळे खडसे झाले केविलवाणे- गिरीश महाजन
तालुक्यातील उत्राण, हणमंतखेडे, कढोली, रवंजे, रिंगणगाव, दापोरी, टाकरखेडे यासह गिरणा नदीपात्रालगत असलेल्या गावातून दररोज सुमारे ५० वाहनांतून बिनधास्तपणे वाळूची चोरट्या मार्गाने वाहतूक केली जात आहे. वाळूचोरीमुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होत असून, ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. सुमारे ५० वाहनांतून वाळू वाहतूक केली जात असताना स्थानिक महसूल प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करून वाळूमाफियांना अभय देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. वाळू वाहतूक करणारी वाहने रस्त्यावरून भरधाव जात असल्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची भीती आहे.
माफियांविरुद्ध तक्रार करणाऱ्यास धमकी देण्याचा प्रकारदेखील वाढला आहे. आमच्याविरुद्ध कोणाकडेही तक्रार करा, अधिकाऱ्यांचे नंबर आहेत का आम्ही देऊ, आमच्यावर कोणतीही कारवाई होऊ शकत नाही, असे वाळूमाफिया आत्मविश्वासाने सांगत आहेत. शहरासह ग्रामीण भागात अनेक नवीन बांधकामे सुरू असून, वाळूमाफियांकडून ठिकठिकाणी वाळूचे साठे करण्यात आले आहेत.
वाचा- झटपट लाॅटरीच्या नावाखाली सुरू होता सट्टापेढ्यांचा धंदा; ते ही पोलिस स्टेशनच्या काही अंतरावर !
वाळूची टंचाई निर्माण करून जादा दराने विक्री करून ग्राहकांची लूट केली जात आहे. वाळूमाफियांचे दलाल दिवसभर महसूल कार्यालय परिसरात फिरत असल्यामुळे नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. सायंकाळी सातपासून सकाळी आठपर्यंत वाळूची वाहतूक बिनधास्त सुरू आहे. वाळूचोरीस आळा घालण्यात अथवा कारवाई करण्यास स्थानिक महसूल प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले असून, जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष घालून वाळूमाफियांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे