झटपट लाॅटरीच्या नावाखाली सुरू होता सट्टापेढ्यांचा धंदा; ते ही पोलिस स्टेशनच्या काही अंतरावर ! 

रईस शेख
Wednesday, 4 November 2020

शहर पोलिस ठाण्यापासुन जवळ आणि मध्यवर्ती बाजारपेठेत पोलिसांना हप्ते देवुन सट्टा बाजार चालवला जात असल्याची कुरबर असून यापुर्वी अनेक तक्रारी करण्यात आल्या.

जळगाव : जळगाव शहरात अवैध धंद्याचा सुळसुळाट असून  शहरात मध्यवर्ती ठिकाण आणि शहर पेालिस ठाण्या जवळच झटपट लॉटरीच्या नावाखाली अवैध धंदे सुरु होता. सहाय्यक पोलिस अधीक्षकांना गुप्त माहिती मिळाली आणि पोलिस पथकाने अचानक छापेमारी करुन तीन अड्ड्यांवर कारवाई करुन गुन्हे दाखल केले. 

वाचा- जळगाव शहरात तात्पुरत्या मलमपट्टीने रस्त्यांची आणखी लागली वाट !
 

मुख्यबाजारपेठेत जुने बसस्टॅण्ड शेजारीच लॉटरी गल्लीत झटपट नावाखाली दिवस इलेक्ट्रॉनीक पद्धतीने रात्र सट्टा-जुगार आणि बेटींगचा व्यवसाय सुरु असल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंधा यांना मिळाली होती. मुख्यालयातील पथकाने छापा टाकून एकुण ५० हजार ८६० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कारवाईत साई लॉटरीचे संतोष शांताराम सोनवणे (वय-४२ शनिपेठ),यांच्या ताब्यातून ८५० रूपये रोख, चार प्रिंटर, कॉम्प्यूटर, मॉनिटर, गजानन लॉटरी चालक रितेश सुभाष पांडे (वय-४७, रा. इश्वर कॉलनी) यांच्या कडील ४ हजार ५० रूपये रोख, सट्टा खेळण्याच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूसंह १७ हजार ५० रूपयांचा मुद्देमाल तर तिसऱ्या कारवाईत बालाजी लॉटरीच्या विजय नारायण वाणी (वय-५८ रा. नवीपेठ) याच्याकडून २ हजार ४६० रूपये रोख १४ हजार ५६० रूपयांचा ऐवज अशा तिघा कारवाईत ५० हजार ८६० रूपयांचा ऐवज जप्त करण्यात येवुन तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 

पोलिसांच्या नाकाखाली.. 
शहर पोलिस ठाण्यापासुन जवळ आणि मध्यवर्ती बाजारपेठेत पोलिसांना हप्ते देवुन सट्टा बाजार चालवला जात असल्याची कुरबर असून यापुर्वी अनेक तक्रारी करण्यात आल्या. पोलिस अधीक्षक, अप्पर अधीक्षकांच्या बदलीनंतर नव्याच अधीकाऱ्याने जुन्या धंद्यावर छापेमारी केल्याने अवैध धंदेवाईकांच्या भुवया उंचावल्या असून हप्तेखोर पोलिसही अवाक झाले आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon police cracked down on illegal speculators in the city center