फडणवीसांना कुरकूरीत खाण्याची झाली इच्छा...आणि मग पुढे झाले काय...!

आल्हाद जोशी  
Thursday, 9 July 2020

विरोधी पक्षनेते फडणवीस व त्यांच्यासह उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांनी फुटाणे व खारे शेंगदाणे याचा आस्वाद घेतला. तसेच महेंद्र चौधरी यांनी घरून आणलेली कॉफी बरोबर घेतली.

एरंडोल : नाशिक, धुळे जिह्याचा दौरा केल्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्यासमवेत भाजपचे नेते जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर बुधवारी रात्री आले. जळगाला येत असतांना फडणवीसांना कुरकुरीत खाण्याची ईच्छा झाली. मग काय आलेल्या सर्व नेत्यांनी शहरातील फुटाणे विक्रेत्याकडून फुटाणे व खारे शेंगदाणे घेऊन त्याचा आस्वाद घेतला. तसेच एका युवा कार्यकर्त्याने आणलेल्या कॉफीचा देखील त्यांनी आस्वाद घेऊन साधेपणा दाखवून दिला. 

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह माजी मंत्री व पदाधिकारी ‘कोरोना’ची पाहणी करण्यासाठी जिल्ह्याच्या दौ-यावर आले होते. धुळे येथून जळगाव येथे सर्व पदाधिकारी जात असताना माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार यांना फोन करून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांच्यासह सर्व सहकारी एरंडोल येथे थांबणार असून, त्याठिकाणी चहा घेणार आहेत. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना चौफुली येथे थांबण्याची सूचना केली. विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या वाहनांचा ताफा थांबला. श्री. फडणवीस यांनी जय बजरंग ट्रेडर्सचे संचालक महेंद्र चौधरी यांना याठिकाणी काही कुरकुरीत पदार्थ मिळेल का? असे विचारले. 

कॉफीचा देखिल घेतल आस्वाद
चौधरी यांनी शहरातील फुटाणे व खारे शेंगदाणे प्रसिद्ध असल्याचे सांगितले व सागर रसवंतीचे संचालक अशोक भोई यांना त्वरित फुटाणे व शेंगदाणे आणण्याचे सांगितले. विरोधी पक्षनेते फडणवीस व त्यांच्यासह उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांनी फुटाणे व खारे शेंगदाणे याचा आस्वाद घेतला. तसेच महेंद्र चौधरी यांनी घरून आणलेली कॉफी बरोबर घेतली. सुमारे पाच मिनिटे फडणवीस यांनी उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांशी कोरोना पाऊस, खरीप हंगाम या विषयावर चर्चा करून जळगावकडे प्रयाण केले. माजी मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या साधेपणामुळे कार्यकर्ते आपसात चर्चा करीत होते. खारे शेंगदाणे व फुटाणे यांची चव छान असल्याचे श्री. फडणवीस यांनी नगराध्यक्ष करण पवार यांना सांगितले. 

संपादीत - भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Erandol Devendra Fadnavis wanted to eat crunchy and eat by salted peanuts, coffee