नगराध्यक्षांच्या घरातूनच बुलेट रात्रीतून केली गायब

आल्‍हाद जोशी
Tuesday, 17 November 2020

शहरात मोटर सायकल व मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

एरंडोल (जळगाव) : येथील नगराध्यक्ष रमेश परदेशी यांचे पुत्र तथा भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष निलेश परदेशी यांच्या बुलेटची रात्री अज्ञात चोरट्याने चोरी केली. नगराध्यक्षांच्या घराच्या आवारातूनच बुलेट चोरीमुळे अन्य वाहन धारकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात मोटर सायकल चोरीच्या प्रमाणात वाढ झाली असून चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

एरंडोल नगराध्यक्ष रमेश परदेशी यांचे पुत्र तथा भाजपचे शहराध्यक्ष निलेश परदेशी हे काल रात्री कृषी केंद्र बंद करून घरी आले. रात्री त्यांनी त्यांच्या मालकीची बुलेट (क्रमांक एमएच 19, सीएल 9055) घरासमोरील अंगणात लावली होती. सकाळी सात वाजता त्यांना अंगणात लावलेली बुलेट दिसून आली नाही. यामुळे त्यांनी घराच्या परिसरात तसेच गावात शोध घेतला असता गाडी आढळून आली नाही. याबाबत निलेश परदेशी यांच्या तक्रारीवरून पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.

यापुर्वीही घटना आता तर नगराध्यक्षाच्या घरीच
दरम्यान शहरात मोटर सायकल व मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. यापूर्वी देखील निलेश परदेशी यांच्या मोटर सायकलची चोरी झाली असून तिचा अद्यापपर्यंत तपास लागलेला नाही. दरम्यान मोटर सायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त घालावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news erandol head of the city home bullet robbery