esakal | मधुकर’ कारखान्याच्या कामगारांची दिवाळी अंधारात !
sakal

बोलून बातमी शोधा

मधुकर’ कारखान्याच्या कामगारांची दिवाळी अंधारात !

मधुकर कारखान्याच्या कामगारांचे जानेवारी २०१७ पासून ते ऑक्टोबर २०२० पर्यंत ४६ महिन्यांचे पगार थकीत झालेले आहेत.

मधुकर’ कारखान्याच्या कामगारांची दिवाळी अंधारात !

sakal_logo
By
समीर तडवी

फैजपूर : फैजपूर येथील मधुकर कारखान्याच्या कामगारांचे ४६ महिन्यांचे पगार थकीत झाले आहेत. हक्काची रक्कमसुद्धा मिळाली नाही, त्यामुळे कामगार आर्थिक विवंचनेत असताना दिवाळीसारख्या सणासाठी कामगारांच्या पदरात निराशा पडल्याने कामगारांच्या अडचणी दूर करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार, लोकप्रतिनिधी, तसेच विद्यमान संचालक मंडळाने लक्ष घालून पाठपुरावा करावा, असे मसाकाच्या राष्ट्रीय कामगार संघाने प्रसिद्धीपत्रक दिले आहे. 

आवश्य वाचा- जळगाव असो वा बिहार, कॉँग्रेसचा ‘आव’ जास्त अन् ‘जोर’ कमीच ! 

फैजपूर येथील मधुकर कारखाना या भागाचा अर्थव्यवस्थेचा कणा व केंद्रबिंदू आहे. उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात ४२ वर्षे अखंडपणे सुरू असल्याची परंपरा या कारखान्याने कायम ठेवली. या प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक घटकांना रोजगार मिळाला. मात्र चार-पाच वर्षे साखरेचे भाव घसरल्याने व उत्पादन खर्चापेक्षा साखरेला कमी भाव मिळत असल्याने त्यातच भर म्हणजे पावसाच्या कमतरतेमुळे उसाची लागवड कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे ४२ वर्षे अखंडपणे सुरू असलेल्या मधुकर कारखान्यासमोर असलेल्या आर्थिक संकटामुळे प्रथमच २०१९-२०२० चा गळीत हंगाम बंद होता. यंदाही चालू वर्षाचा गळीत हंगाम बंद राहणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या कारखान्याच्या कामगारांचा संयम सुटल्याने मसाकाच्या राष्ट्रीय कामगार संघाने प्रसिद्धीपत्रक दिले आहे, त्यात म्हटले आहे, की मधुकर कारखान्याच्या कामगारांचे जानेवारी २०१७ पासून ते ऑक्टोबर २०२० पर्यंत ४६ महिन्यांचे पगार थकीत झालेले आहेत. विम्याची व पोस्टाची बचत रक्कमसुद्धा थकीत आहे. कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी जुलै २०१८ नंतरचा भरलेला नाही, त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन लागण्यास अडचणी येत आहेत, तसेच २०१३ नंतरच्या निवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटीची हक्काची रक्कमही मिळाली नाही. अशा परिस्थितीत घरखर्च, मुलांचे शिक्षण, लग्न, दवाखाना व इतर खर्च भागविणे कठीण झाले आहे. प्रसिद्धीपत्रकावर मसाकाच्या राष्ट्रीय कामगार संघाचे अध्यक्ष किरण चौधरी व सरचिटणीस सुनील कोलते यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

 
केंद्र-राज्याने लक्ष द्यावे : 
कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यांच्या घरात चुली पेटणे कठीण झाले आहे. साखर कामगारांनी आर्थिक विवंचनेत असताना आजच्या या धकाधकीच्या जीवनात जीवन कसे जगावे, हा यक्षप्रश्न आहे. या अडचणी दूर करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार, लोकप्रतिनिधी तसेच विद्यमान संचालक मंडळाने लक्ष घालून पाठपुरावा करावा, अशी मागणी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. 

वाचा- जळगाव जिल्हा रुग्णालयात ‘पोस्ट कोविड ओपीडी’सुरू


कामगारांचे ४६ महिन्यांचे पगार थकीत झालेले आहेत. हक्काची रक्कम मिळाली नाही. दिवाळी सण असल्यावरही कामगारांचे पगार व हक्काची रक्कम मिळाली नाही. म्हणून कामगारांचा संयम सुटला आहे. कामगारांच्या आर्थिक विवंचनेचा विचार करून या भागातील लोकप्रतिनिधी, तसेच विद्यमान संचालक मंडळाने लक्ष घालून केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करणे गरजेचे आहे. 
-किरण ओंकार चौधरी, 
अध्यक्ष, मसाका राष्ट्रीय कामगार संघ, फैजपूर 

loading image