अवाजवी बिलाचा घोळ;  तक्रारी ऐकण्यासाठी  "महावितरण'ने उघडले कान! 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 29 June 2020

"महावितरण'च्या जळगाव परिमंडळातर्फे 28 जून ते 10 जुलै या कालावधीत तक्रार निवारण व शंका निरसन शिबिर आयोजित करण्यात आली आहेत.

जळगाव  : लॉकडाउनच्या काळात वीज ग्राहकांना सरासरी बिलाची आकारणी झाली. परंतु आता लॉकडाउननंतर तीन महिन्यांच्या रीडिंगनुसार आकारण्यात आलेले बिल हे अवाजवी असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत असल्याने "महावितरण'ने तक्रार निवारण व शंका निरसन शिबिराचे आयोजन केले आहे. 

"कोरोना'च्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीच्या 23 मार्च ते 22 मे 2020 या कालावधीत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून वीज देयक भरणा केंद्रे, वीज मीटर रीडिंग व वीज देयकांचे वाटप बंद ठेवले होते. टाळेबंदीच्या कालावधीत ग्राहकांना स्वत:चे वीज मीटर रीडिंग करून मोबाईल ऍप किंवा पोर्टलद्वारे नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले होते. ज्या ग्राहकांनी वीज मीटर रीडिंग नोंदविले, अशा ग्राहकांना त्यानुसार वीजदेयके दिली गेली. अन्य ग्राहकांना सरासरी बिल देण्यात आले. ग्राहकांना वीजदेयके मोबाईल ऍप, पोर्टलवर पाहण्याची व ऑनलाइन पद्धतीने भरण्याची सुविधा उपलब्ध असल्याबाबत जनजागृती करण्यात आली. नोंदणीकृत मोबाईलधारकांना माहितीचे एसएमएस पाठविण्यात आले. 22 मे 2020 नंतर (प्रतिबंधात्मक क्षेत्र वगळता) टप्याटप्याने वाटप प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. प्रत्यक्ष मीटर वाचनानंतर ग्राहकांना एप्रिल, मे व जून या तीन महिन्याचे एकत्रित देयक वीज युनिटच्या टप्पेनिहाय दर आकारणीच्या लाभासह (स्लॅब बेनिफिट) दिले आहे. ज्या ग्राहकांनी वीजदेयकांचा भरणा केला आहे. त्या भरणा रकमेची वजावट करून देयके दिली आहेत. परंतु, बिलांमध्ये घोळ असून, तीन महिन्यांसाठीचे बिल हे चार महिन्याचे असल्याचे जाणवत आहे. 

बारा दिवस ऐकणार तक्रारी 
जळगाव परिमंडळांतर्गत असलेल्या जळगाव, धुळे व नंदुरबार मंडळातील घरगुती वीज ग्राहकांसाठी टाळेबंदीनंतरच्या वीज देयकांच्या अनुषंगाने "महावितरण'च्या जळगाव परिमंडळातर्फे 28 जून ते 10 जुलै या कालावधीत तक्रार निवारण व शंका निरसन शिबिर आयोजित करण्यात आली आहेत. ग्राहकांनी नियोजित दिवशी संबंधित उपविभाग वा कक्ष कार्यालयाच्या ठिकाणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी केले आहे. परिमंडळस्तरावर मुख्य अभियंता यांनी जळगाव, धुळे व नंदुरबार मंडळातील औद्योगिक ग्राहक व ग्राहक संघटना प्रतिनिधींसमवेत वेबिनारद्वारे संवाद साधून ग्राहकांच्या टाळेबंदीच्या कालावधीतील वीजदेयकांच्या शंकाचे निरसन करून व वीजपुरवठ्यासंदर्भातील अडचणींची दखल घेतली आहे. वेगवेगळ्या उपविभागीय कार्यालय कक्षात सकाळी अकरा ते दुपारी चार दरम्यान हे शिबिर होणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jagaon MSEDCL light bill complaints sole center !