esakal | धरणे ‘ओव्हर फ्लो’..हतनूर, वाघूरचे दरवाजे उघडल्याने नद्यांना पूर
sakal

बोलून बातमी शोधा

Dam Overflow

धरणे ‘ओव्हर फ्लो’..हतनूर, वाघूरचे दरवाजे उघडल्याने नद्यांना पूर

sakal_logo
By
देविदास वाणी


जळगाव : गेल्या आठवड्यात तहानलेली जिल्ह्यातील धरणे (Dam) गेल्या दोन ते तीन दिवसांपासून दमदार बरसत असलेल्या पावसाने ‘ओव्हरफ्लो’ झाली आहेत. सोमवारी (ता. ६) रात्रीपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरू असून, मंगळवारी (ता. ७) रात्रीपर्यंत हतनूरचे (Hatnur Dam) २४ दरवाजे पूर्ण व वाघूर धरणाचे (Waghur Dam) १० दरवाजे ५० सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे अनुक्रमे तापी व वाघूर नदीला पूर आला असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा: प्रांतांच्या अहिराणी भाषेतील आवाहनास ग्रामस्थही गहिवरले


जळगाव जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. शनिवारी (ता. ४) रात्री आणि पुन्हा सोमवारी मध्यरात्री जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील उपनद्यांना पूर आला. तिकडे तापीच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाने हतनूर धरण भरले असून, मंगळवारी रात्री आठपर्यंत धरणाचे २४ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात येऊन त्यातून ५४ हजार क्यूसेक विसर्ग सुरू आहे.

नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा
वाघूर नदीच्या पाणलोट क्षेत्रासह जामनेर तालुक्यात सोमवार रात्रीपासून जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे कांग, वाघूर नदीला पूर आला आहे. वाघूर धरण पूर्ण भरले असून, त्याचे १० दरवाजे ५० सेंटीमीटरने खुले करण्यात आले आहेत. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास वाघूर धरणातून १५ हजार ३७२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता, तो रात्री वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापी व वाघूर नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा: तोंडापूर मध्यम प्रकल्प ओहर फ्लो; पाय घसरून तरुण बेपत्ता

अंजनी प्रकल्पातूनही विसर्ग सुरू
एरंडोल तालुक्यातील अंजनी धरणातही पाणीसाठा वाढत असून, धरणाची पातळी केवळ ४ ते ५ फूट खाली आहे. मंगळवारी अंजनी नदीच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने धरणातील पाणीसाठा वाढत असून, अंजनी प्रकल्पातूनही विसर्ग सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंजनी नदीकाठच्या गावांनाही सूचना देण्यात आली आहे.

loading image
go to top