सहा फूट खोल खड्ड्यात दुचाकी; अमृतचे खड्डे उठले जीवावर

रईस शेख
Tuesday, 5 January 2021

राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक अमृत योजना सद्या जळगावकरांच्या जिवावर उठल्याची परिस्थिती आहे. निष्काळजी आणि असुरक्षित पद्धतीने सुरू असलेल्या कामाच्या खड्ड्यात दुचाकीसह तरुण पडल्याची घटना सोमवारी रात्री दहाच्या सुमारास घडली.

जळगाव : अमृत योजनेसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात दुचाकीसह तरुण कोसळण्याची घटना सोमवारी (ता. ४) रात्री दहाला घडली. अपघातात तरुणाचे थोडक्यात प्राण वाचले असून, किरकोळ दुखापतीवर निभावले. निष्काळजीमुळे अपघात आणि संपूर्ण शहर खोदून ठेवल्याने होणारा धुळीचा त्रास आणि मणक्यांच्या आजाराने जळगावकर त्रस्त झाले आहेत. 
राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक अमृत योजना सद्या जळगावकरांच्या जिवावर उठल्याची परिस्थिती आहे. निष्काळजी आणि असुरक्षित पद्धतीने सुरू असलेल्या कामाच्या खड्ड्यात दुचाकीसह तरुण पडल्याची घटना सोमवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. जुबेर जमील देशपांडे (वय २४) हा तरुण स्कूटी घेऊन घराकडे जात होता. रस्त्यात पाइपलाइन टाकण्यासाठी खेादलेला सहा फूट खोल खड्डा तसाच उघडा सेाडून देण्यात आला होता. तसेच रात्री पथदिवे बंद असल्याने जुबेर देशपांडे याला खड्ड्याचा अंदाज आला नाही व तो दुचाकीसह खाली कोसळला. त्याच्या डोळ्याजवळ, कपाळाला मार लागला असून, थोडक्यात त्याचा जीव वाचल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. 

नागरिक प्रचंड त्रासलेत 
अमृत योजनेच्या नावाखाली संपूर्ण शहर खोदून ठेवण्यात आले आहे. केवळ व्हीव्हीआयपी रहिवास असलेल्या मुख्य रस्त्याची कामानंतर डागडुजी केली गेली. उर्वरित शहरात परिस्थिती पचंड बिकट झाली आहे. या खड्ड्यांमुळे धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून, वाहनांचे अपघात नित्त्याचे झाले आहेत. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon amrut yojna road damage and bike accident