जळगाव शहरात ‘अमृत’च्या जलवाहिन्या लवकरच मुख्य जलवाहिनीला जोडल्या जाणार ! 

भूषण श्रीखंडे
Wednesday, 4 November 2020

खासदार उन्मेष पाटील यांनी महापालिकेची आढावा बैठक घेत अमृतच्या कामांबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर महापौर श्रीमती सोनवणे यांनी मंगळवारी अमृत योजनेच्या कामांची पाहणी केली.

जळगाव  ः अमृत योजनेंतर्गत सुप्रीम कॉलनी परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या पाण्याच्या अंडरग्राउंड टाकीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सुप्रीम कॉलनीतील नागरिकांना उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी लवकरात लवकर मुख्य जलवाहिनी जोडण्याचे काम करावे, अशा सूचना महापौर भारती सोनवणे यांनी दिल्या. 

वाचा- जळगाव जिल्ह्याला दिलासा; कोविड सेंटरमधे राहिले ३७ रुग्ण ! -

सुप्रीम कॉलनीतील पाणी टाकीच्या बांधकामाची मंगळवारी (ता. ३) महापौर भारती सोनवणे यांनी पाहणी केली. या वेळी नगरसेवक कैलास सोनवणे, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे, गटनेते भगत बालाणी, गणेश सोनवणे, प्रवीण कोल्हे, प्रभाग समिती सदस्य विठ्ठल पाटील, संदीप बऱ्हाटे, ॲड. संदीप पाटील, महापालिका शहर अभियंता अरविंद भोसले, बाबा साळुंखे, शाखा अभियंता विलास पाटील, अमृत योजना मक्तेदार प्रतिनिधी पंकज बऱ्हाटे, शाहीद सय्यद, चंद्रकांत भापसे, रऊफ खान, अजमल शाह आदी उपस्थित होते. महापौर सोनवणे यांनी सांगितले, की अमृत योजनेंतर्गत सुप्रीम कॉलनीत पाण्याची स्वतंत्र टाकी उभारण्यात येत असून, तिचे काम अंतिम टप्प्यात आहे. 

खासदारांच्या नाराजीनंतर 
महापौरांकडून आढावा 

सोमवारी (ता. २) खासदार उन्मेष पाटील यांनी महापालिकेची आढावा बैठक घेत अमृतच्या कामांबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर महापौर श्रीमती सोनवणे यांनी मंगळवारी अमृत योजनेच्या कामांची पाहणी केली. जळगाव शहरात अमृत योजनेचे काम जलद गतीने सुरू आहे. ज्या परिसरात अमृत योजनेचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे ते तत्काळ पूर्ण करावे. सर्व नळजोडण्या देऊन शहरातील आठ झोनमध्ये अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा कार्यान्वित करावा, अशा सूचना महापौरांनी अमृत योजनेच्या कामाच्या आढावा बैठकीत दिल्या. 
 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Amrut's waterways will soon be connected to the main waterways