बँक संचालकांची व्हॉट्सॲप क्लोनिंगद्वारे फसवणुकीचा प्रयत्न 

सचिन जोशी
Tuesday, 8 December 2020

नंबर मिळवत व्हॉट्सॲप अकाउंट क्लोन केले व त्याद्वारे केसवानींच्या संपर्कातील काही व्यक्तींना मेसेज पाठविले. त्यात हॉस्पिटल इमर्जन्सीचे कारण दिले.

जळगाव : व्हॉट्सॲप अकाउंट क्लोन करून संबंधित व्यक्तीच्या मोबाईल यादीतील संबंधितांना व्हॉट्सॲप मेसेज करून, पैशांची मागणी करून फसवणुकीचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. ज्यांच्या बाबतीत हा प्रकार घडला त्या सहकारी बँकेच्या संचालकांनी जागरुकता दाखवत पोलिसांकडे तक्रार केली. 

आवश्य वाचा- Bharat Band Updates : कृषी विधेयकाविरोधात जळगाव शहरात बंदला प्रतिसाद -

जळगाव जनता सहकारी बँकेचे संचालक तथा प्रथितयश कर सल्लागार सुरेश केसवानी यांचे व्हॉट्सॲप अकाउंट क्लोन करून अज्ञात व्यक्तीने त्यांच्या फोनयादीतील संबंधितांना एकामागून एक व्हॉट्सॲप मेसेज करून पैशांची मागणी केली. 

हॉस्पिटलचे कारण सांगून... 
अज्ञात व्यक्तीने केसवानींचा नंबर मिळवत व्हॉट्सॲप अकाउंट क्लोन केले व त्याद्वारे केसवानींच्या संपर्कातील काही व्यक्तींना मेसेज पाठविले. त्यात हॉस्पिटल इमर्जन्सीचे कारण दिले आहे. हॉस्पिटलमध्ये असल्याने कॉल करू शकत नाही, पैसे दोन दिवसांत परत करेल, असे सांगत हजारो रुपयांची मागणी केली. तसेच हा पैसा गुगल पेद्वारे अदा करण्यासाठी मोबाईल नंबरही दिला. 

पोलिसांकडे तक्रार 
याबाबत केसवानी यांनी आज दुपारी सायबर क्राइम विभागाकडे तक्रार केली. सर्व प्रकार संबंधित अधिकाऱ्यांना सांगितला. मात्र, यात पैसा प्रत्यक्ष गेलेला नसल्याने सायबर शाखेकडे गुन्हा नोंदविला जाऊ शकत नाही, असे तांत्रिक कारण सांगण्यात आले. मात्र, संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली जाऊ शकते, असे सांगितल्यानंतर केसवानी यांनी सायंकाळी हा प्रकार पोलिस ठाण्यास कळविला. 

वाचा- जळगाव जिल्ह्यात १५ हमीभाव खरेदी केंद्रांना प्रारंभ
 

...असा घडतो प्रकार 
यात अज्ञात व्यक्ती एखादा मोबाईल क्रमांक हॅक करत व्हॉट्सॲप अकाउंट क्लोन केले जाते. स्टेटस अथवा मेल-खात्यावरील फोटो वापरून मोबाईल यादीतील व्यक्तींना एकतर फोन अन्यथा मेसेज करून पैशाची मागणी केली जाते. मोबाईलधारकांनी अशा प्रकारांपासून सावध राहावे. ज्यांना असे मेसेज आलेत, त्यांनी त्या संबंधित व्यक्तीला थेट कॉल करून खातरजमा करावी, असे आवाहन पोलिस विभागाने केले आहे. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon attempted fraud by whatsapp cloning