घरी जाण्यासाठी रिक्षात बसली महिला; तिघांनी बरोबर हेरत केली हातसफाई

रईस शेख
Friday, 13 November 2020

आधीच रिक्षामध्ये दोन महिला प्रवासी होत्या़. त्यातील एक महिला खाली उतरली व तिने मनिषा यांना मधे बसण्यास सांगितले़. त्यानुसार त्या दोन्ही महिलांच्यामध्ये बसल्या़.

जळगाव : बाजारातून घरी जाण्यासाठी रिक्षात बसलेल्या महिलेच्या पर्समधून 72 हजारांचे दागिने लंपास केल्याची घटना आज उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी रिक्षाचालकास अटक केली आहे.

मेहरूण परिसरातील मनिषा ज्ञानेश्वर शिंदे (वय 48) या दुरूस्तीसाठी टाकलेले सोन्याचे दागिने घेण्यासाठी गुरूवारी दुपारी तीनच्या सुमारास सुभाष चौकात आल्या होत्या़. भाजीपाला खरेदी केल्यानंतर त्यांनी दुरूस्तीचे दागिने घेतले़. त्यानंतर त्या बिलाल चौकात जावयाचे आहे, असे सांगून रिक्षात बसल्या़. आधीच रिक्षामध्ये दोन महिला प्रवासी होत्या़. त्यातील एक महिला खाली उतरली व तिने मनिषा यांना मधे बसण्यास सांगितले़. त्यानुसार त्या दोन्ही महिलांच्यामध्ये बसल्या़.

रस्‍त्‍यातच उतरविले
बोहरा गल्लीतून रिक्षा मेहरूणच्या दिशेने निघाली़. दरम्यान, राधाकृष्ण मंगल कार्यालयाजवळ चालकाने रिक्षा थांबविली़; नंतर मनिषा शिंदे यांना खाली उतरविले व या दोन महिलांना सोडून येतो़, तुम्ही इथेच थांबा असे सांगून चालक प्रवासी भाडे न घेता रिक्षा घेवून निघून गेला़. अखेर मनिषा यांनी दुसऱ्या रिक्षाने घर गाठले़.

घरी आल्यावर प्रकार समोर
घरी पोहचल्यावर त्यांनी पर्स तपासली़; त्यावेळी त्यांना 28 हजार 800 रूपये किंमतीचे सोन्याचे काप व 43 हजार 200 रूपये किंमतीचे सोन्याचे कानाचे झुमके गायब झालेले दिसले़. त्यांनी पर्समध्ये शोध घेतला़ मात्र, मिळून न आल्याने रिक्षात बसलेले असताना चोरून घेतल्याची खात्री त्यांना झाली़. अखेर मनिषा शिंदे यांच्या फिर्यादीरून अज्ञात चोरट्याविरूध्द शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.

सीसीटीव्ही फुटेजवरुन तपास
शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल होताच पोलिसांना रिक्षाचालक व त्यातील प्रवासी महिलांवर संशय बळावला़. त्या दिशेने पोलिसांनी तपासाला सुरवात केली़. रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये रिक्षाचा क्रमांक ट्रेस झाला़. अखेर रिक्षाचालक सय्यद हुसेन सय्यद हसन याला पिंप्राळा- हुडको येथून पोलिसांनी अटक केली़. तसेच रिक्षाही जप्त केली असून सय्यद हुसेन याला शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. इतर व्यक्तींचाही पोलिस शोध घेत आहेत़. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon auto riksha traveling women and jwellary robbery