बीएचआर’ अफरातफर : कवडीमोलदरात मालमत्ता गडप

रईस शेख
Sunday, 29 November 2020

भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेवर नियुक्त प्रशासक जितेंद्र कंडारे यांनी ८ नोव्हेंबर २०१५ रोजी जळगाव एमआयडीसीतील पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाचे कुलूप तोडून ताबा घेतला होता.

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) चे अवसायिक जितेंद्र कंडारे, उद्योजक सुनील झंवर यांच्यासह इतर संशयितांचे हात बिएचआरच्या नियोजनबद्द लूटीत सहभगाी असल्याचा दाट संशय तपासी यंत्रणेला आहे. ठरवुन ‘बीएचआर’च्या करोडोच्या मालमत्ता कवडीमोल भावात खरेदी केलेल्या सर्व संशयितांच्या मालमत्तेचा शोध तपास यंत्रणा घेत आहे. अटकेतील सुनील झंवर यांच्या मालमत्तांची माहिती घेण्यास सुरुवात झाली असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या आयुक्त भाग्यश्री नवलखे दिली. अर्थात झवर याच्यांसह बीएचआरच्या मालमत्तामध्ये रस असणाऱ्यांच्या संपतीवर आता सरकार जमा होण्याचे संकेत मिळाले आहे. जवळपास १ हजार कोटीची मालमत्ता त्याच त्या ठरावीक लोकांनीच कशा खरेदी केल्या याचा शोध घेतला जात आहे. 

भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेवर नियुक्त प्रशासक जितेंद्र कंडारे यांनी ८ नोव्हेंबर २०१५ रोजी जळगाव एमआयडीसीतील पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाचे कुलूप तोडून ताबा घेतला होता. त्यानंतर बीएचआर या अवसायानात असलेल्या पतसंस्थे विरोधात व अवसायक जितेंद्र कंडारे यांच्या साशंक कारभाराच्या विरोधात १९ जुलै २०१९ रोजी महाराष्ट्र व्यापी ‘धडकी भरो छत्री’ आंदोलन करण्यात आले होते. जितेंद्र कंडारे हे साशंक पद्धतीने काम करत असल्याने आम्हाला ठेवी परत मिळत नसल्याचा आरोप ठेवीदारांनी केला होता. त्यावेळी ठेवीदारांनाकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात आल्या होत्या की, जितेंद्र कंडारे हे कर्जदारा सोबत मिलीभगत करून ठेवीदारांना ठेवी परत करताना ठेवीच्या मूळ रकमेच्या केवळ ३० टक्के परत देतात आणि ठेवीदारांकडून ठेवीची १०० टक्के रक्कम प्राप्त झाल्याचे लिहून घेतात. तसेच ठेवीची पावती कर्जदाराला हस्तांतरित करून कर्ज रकमेतून वरती केल्याचे कागदोपत्री दर्शविले जात होते. 

कंडारे मालामाल? 
अगदी कर्ज नील झाल्याचे सर्टिफिकेट कर्जदाराला देखील दिले जात होते. मात्र, त्याच्या खात्यात तशी नोंद होत नव्हती. या व्यवहारात ठेवीदारांना ठेवीची दिलेली ३० टक्के रक्कम वगळून उरलेली ७० टक्के रकमेतील ३० ते ४० टक्के रक्कम श्री.खंडारे यांना कमिशन म्हणून रोख स्वरूपात मिळत असल्याचा आरोप होत होता. ही रक्कम बेहिशोबी असल्याने तिची नोंद कागदोपत्री कुठेही आढळत नाही. यातून श्री.कंडारे यांनी स्वतःची पत्नी आई-वडील मेहुना तसेच औरंगाबाद येथील जमीन खरेदी विक्री व्यवसाय करणारा भाऊच्या आणि जळगाव येथील दुकान व जागा खरेदी विक्री करणाऱ्या भावाच्या नावे अनेक ठिकाणी गुंतवणूक केली असल्याच्या माहितीवरुन तपासयंत्रणा त्याचा शोध आता घेत आहे. 

झवरच्या मागे...कोण? 
उद्योजक, कॉन्ट्रॅक्टर म्हणुन प्रख्यात सुनील झवर यांनीच ‘बीएचआर’ सर्वात जास्त मालमत्ता खरेदी केल्याची माहिती असून तपास यंत्रणेने २०१५ नंतर झंवर यांनी पाळधी, नाशिक, मुंबई, पुणेसह इतर राज्यात खरेदी केलेल्या मालमत्ता आपल्या रडारवर घेतल्या आहेत. बीएचआरच्या कोट्यावधी रुपयांच्या मालमंत्ता वारंवार ठरावीक माणसांना मिळवुन देण्यासाठी राजकिय वजन वापरले गेल्याची शक्यता असून झवर यांच्या गॉडफादर संदर्भात चर्चा असली तरी, तसे पुरावे शोधण्याचे आव्हान तपास यंत्रणेला आहे. अवसायक कंडारे आणि झंवर यांचे काही आर्थिक व्यवहार प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष झाले आहेत का? याची देखील माहिती पोलीस घेत आहेत. दरम्यान, सुनील झंवर यांच्या मालमत्तांची माहिती घेण्यास सुरुवात झाली असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या आयुक्त भाग्यश्री नवलखे यांनी स्पष्ट केले आहे. 

संपत्ती होणार सरकार जमा 
बीएचआर अवसायनात गेल्यानंतर ठेवीदारांच्या ठेवी परत करण्याच्या नावे केाट्यावधींच्या मालमत्ता ठरावीक लोकांनाच विक्री करण्यात आल्या आहेत. बाजार भावा पेक्षा कवडीमोल दराने या मालमत्ता घेणारे, मालमत्ता मिळवून देण्यासाठी मदत करणारे अवसायक, ठेवीदारांचा रेटा कायम करुन राजकिय दबाव निर्माण करणारे अशांची यादीच तपास यंत्रणेने तयार केली असून चौकशी अंती या सर्वांच्या संपत्तीवर सरकारी टाच येणार आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon bhr ed inquiry property at a bargain price