बापरे..‘बीएचआर’ प्रकरणी ट्रकभर पुरावे पुण्याला 

रईस शेख
Monday, 30 November 2020

तपासणीदरम्यान झंवरच्या कार्यालयातून माजी मंत्र्याचे लेटरहेड हाती लागल्याचे समजते. तसेच, सध्या फरारी असलेला मुख्य सूत्रधार अवसायक जितेंद्र कंडारे याच्या वाहनचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.

जळगाव : शहरातील एमआयडीसी भागात मुख्य कार्यालय असलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था घोटाळा प्रकरणी पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडून तीन दिवसांपासून तांत्रिक माहितीसह कागदपत्रांची चौकशी सुरू होती. त्यानंतर ट्रकभर पुरावे घेऊन तब्बल १३५ जणांचे पथक रविवारी (ता. २९) दुपारी पुण्याला परतले. या तपासणीदरम्यान झंवरच्या कार्यालयातून माजी मंत्र्याचे लेटरहेड हाती लागल्याचे समजते. तसेच, सध्या फरारी असलेला मुख्य सूत्रधार अवसायक जितेंद्र कंडारे याच्या वाहनचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. ‘बीएचआर’च्या मुख्य कार्यालयातील पाचशेहून अधिक संगणक, फायली, कागदपत्रे तसेच, संशयित सुनील झंवरच्या रमेश मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या कार्यालयातून कागदपत्रे, संगणक आदी सर्व साहित्य सील करण्यात आले असून, स्वतंत्र ट्रकमधून पुण्यात नेण्यात आले. 
या प्रकरणी पुणे येथे दाखल गुन्ह्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या नेतृत्वात सहाय्यक उपायुक्त प्रेरणा कट्टे, उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, पोलिस उपायुक्त कल्याण विधाते, किशोर जाधव, गलांडे यांच्यासह २२ पोलिस निरीक्षक, २२ सहाय्यक पोलिस निरीक्षक व कर्मचारी अशा १३५ हून अधिक कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (ता. २७) जळगाव शहरात ‘बीएचआर’चे अवसायक जितेंद्र कंडारे, विवेक ठाकरे, सुनील झंवर, तसेच महावीर जैन, धरम सांखला यांच्या घरांसह कार्यालयावर छापे टाकले. शनिवारी (ता. २८) पथकाने सुजीत बाविस्कर (वाणी) (वय ६५, रा. सेंट्रल बँक कॉलनी, पिंप्राळा), धरम सांखला (४०, रा. शिवकॉलनी), महावीर जैन (३७, रा. गुड्डूराजानगर) व विवेक ठाकरे (४५, रा. देवेंद्रनगर) यांना अटक केली होती. चौघांना ६ डिसेंबरपर्यंत नऊ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. 
 
ट्रकभर पुराव्यांचे घबाड 
चौघांना ताब्यात घेतल्यावर पथकांकडून ‘बीएचआर’च्या मुख्य कार्यालयात तांत्रिक पुरावे, फायली, कागदपत्रे सील करण्याचे काम सुरू होते. पंचांसमक्ष पंचनामा करून कागदपत्रे व संगणक सील करण्यात आले. विवेक ठाकरे यांच्या गोलाणीमधील कार्यालयातून काही कागदपत्रे-संगणक ताब्यात घेतली. यानंतर झंवर यांच्या कार्यालयातून सील करण्यात आलेले संगणक, कागदपत्रे, फायली, सांखला यांच्या घरातून कार्यालयातून मिळालेले दस्तऐवज पुरावे संकलित करून त्याचा पंचनामा करून ट्रक पुण्याला रवाना झाला आहे. 
 
झंवरकडे माजी मंत्र्याचे लेटरपॅड 
गॅझेटेड अधिकाऱ्यांचे शंभर शिक्के सापडल्यानंतर रविवारी (ता. २९) ‘बीएचआर’च्या मालमत्ता खरेदी-विक्री प्रकरणातील प्रमुख संशयित सुनील झंवर याच्या खान्देश कॉम्प्लेक्समधील कार्यालयातून महापालिकेशी संबंधित अनेक दस्तऐवज, पुरावे मिळून आले आहेत. त्यासोबतच वॉटर ग्रेस कंपनीच्या कागदपत्रांसह माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे लेटरपॅड हाती लागले आहे. दरम्यान, आवश्‍यक कागदपत्रे रीतसर पंचनाम्यासह जप्त केली आहेत. परंतु कुणाच्याही नावाचा कागद हा नेमका कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे, याचा सखोल तपास केल्यानंतर स्पष्टपणे सांगता येईल, असे नवटके यांनी सांगितले. 
 
जामनेर लिंकची चर्चा 
सुनील झंवर माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जातात. व्यावसायिक आणि राजकीय संबंधांसह मित्रपरिवारातही झंवर प्रख्यात आहेत. महाजनांचे लेटरहेड सापडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, प्राप्त दस्तऐवज, पुरावे आणि ‘बीएचआर’च्या मालमत्ता व रोख रुपयांच्या गैरव्यवहारात जो कोणी तपासात समोर येईल, त्याच्यावर कारवाई होणार असल्याचे तपासाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. 
 
कंडारेचा चालक ताब्यात 
अवसायक आणि गुन्ह्यातील संशयित जितेंद्र कंडारे याचा वाहनचालक कमलाकर कोळी आज सकाळी ‘बीएचआर’च्या मुख्य शाखेत वाहन लावण्यासाठी आला होता. या वेळी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने विचारपूस केली असता, त्याने सांगितले, की मी कंडारे यांना औरंगाबाद ते नगरदरम्यान सोडले. कंडारेला नेमकं कुठं सोडले?, याबाबत समाधानकारक माहिती न दिल्याने त्याला ताब्यात घेण्यात येऊन पुणे येथे रवानगी करण्यात आली आहे. तसेच, संबंधित चारचाकी (एमएच १९, बीयू २३२३) जप्त करून पुण्याला नेण्यात आली आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon bhr fraud case evidence going pune