बीएचआर घोटाळा: राज्यभरातील सात खटल्यांचे कामकाज जळगावात 

रईस शेख
Wednesday, 9 December 2020

अंकल रायसोनीसह १४ संशयितांच्या गँगवर जळगावच्या रामानंदनगर पोलिस ठाण्यांसह तब्बल ८१ विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहे.

जळगाव  : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटी (बीएचआर)चा संस्थापक अध्यक्ष प्रमोद ऊर्फ अंकल रायसोनी हा त्याच्या साथीदारांसह सुमारे पाच वर्षांपासून कारागृहात आहे. बेहिशेबी ठेवींचे संकलन करून त्याचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी राज्यभर दाखल व तपास पूर्ण झालेल्या सात गुन्ह्यांत अंकल रायसोनी ॲन्ड गँगवर दोषारोपपत्र मंगळवारी सादर करण्यात आले. 

वाचा- कापुस खरेदी केंद्रावर व्यापाऱ्यांना टोकन दिल्यास कारवाई 
 

बीएचआर मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह पतसंस्थेत झालेल्या अपहार, फसवणूक व गैरव्यवहार प्रकरणात शिवराम चौधरी (वय ७५, रा. शिव कॉलनी) यांच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तत्कालीन तपासाधिकारी (स्व.) अशोक सादरे यांनी संस्थेचे संस्थापक प्रमोद भाईचंद रायसोनी (वय ५५, रा. बळिराम पेठ, जळगाव), दिलीप कांतिलाल चोरडिया (५१), सूरजमल भबुतमल जैन (५०), दादा रामचंद्र पाटील (६६), भागवत संपत माळी (६३), राजाराम काशीनाथ कोळी (४७), भगवान हिरामण वाघ (६०), यशवंत ओंकार जिरी (६०), शेख रमजान शेख अब्दुल नबी मन्यार (५५), सुकलाल शहादू माळी (४५), ललीताबाई ऊर्फ लता राजू सोनवणे (३९, सर्व रा. तळेगाव, ता. जामनेर), मोतीलाल ओंकार जिरी (५०, रा. शेळगाव, ता. जामनेर), डॉ. हितेंद्र यशवंत महाजन (५२, रा. बेंडाळेनगर, प्रेमनगर, जळगाव) व इंद्रकुमार आत्माराम ललवाणी (४०, रा. महाबळ, जळगाव) यांना २ फेब्रुवारी २०१५ ला अटक केली होती. गुन्ह्यांच्या तपासात संशयितांना विविध सात गंभीर कलमांमध्ये दोषी धरण्यात आले असून, संशयितांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. 

राज्यभर गुन्हे 
अंकल रायसोनीसह १४ संशयितांच्या गँगवर जळगावच्या रामानंदनगर पोलिस ठाण्यांसह तब्बल ८१ विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल असून, अमरावती, परभणी, लातूर, सांगली, सातारा यांसह पुण्यात दाखल विविध सात गुन्ह्यांमध्ये मंगळवारी (ता. ८) तदर्थ जिल्‍हा व सत्र न्यायाधीश आर. एन. हिवसे यांच्या न्यायालयात सरकार पक्षाने सादर झाले. बीएचआर अपहार-गैरव्यवहार प्रकरणात संचालक मंडळाविरुद्ध राज्यभर दाखल गुन्ह्यांपैकी तपास पूर्ण झालेल्या सात गुन्ह्यांची सुनावणी जळगाव न्यायालयात होणार आहे. या सातही गुन्ह्यांतील देाषारोपपत्र जिल्‍हा सरकारी अभियोक्ता, ॲड. केतन ढाके यांनी एकत्रीत दोषारोपपत्र सादर केले. संशयितांतर्फे ॲड. अकिल इस्माईल कामकाज पाहात आहेत.  
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon BHR scam seven cases work in jalgaon