esakal | जळगावचा दादा कोण? म्‍हणून व्हिडीओ केला व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

maramari

साधारण ४० लाख लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यात खून, दरोडे, अत्याचाराच्या गुन्ह्यांची रास वाढतीच आहे. अमळनेर आणि भुसावळ शहर हे गुन्ह्यांचे जंक्शन झाले असून, गोळीबार हा किरकोळ विषय बनला आहे.

जळगावचा दादा कोण? म्‍हणून व्हिडीओ केला व्हायरल

sakal_logo
By
रईस शेख

जळगाव : जळगावचा दादा कोण? तू का आम्ही? म्हणत एका तरुणाला आठ ते दहा जणांचे टोळके मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. मारहाण करणाऱ्यांपैकीच कुणीतरी तो व्हायरल केला असून, प्रचंड भीती निर्माण करणाऱ्या या व्हिडिओमुळे पोलिसांची कार्यक्षमता, गुन्हेगारांवरील पकड आणि भीती नष्ट झाल्याचा हा प्रकार असून जिल्ह्याची बिहारच्या दिशेने सुरू झाली की काय, अशी शंका निर्माण होऊ लागली आहे. 

साधारण ४० लाख लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यात खून, दरोडे, अत्याचाराच्या गुन्ह्यांची रास वाढतीच आहे. अमळनेर आणि भुसावळ शहर हे गुन्ह्यांचे जंक्शन झाले असून, गोळीबार हा किरकोळ विषय बनला आहे. खून आणि बलात्कार हे नित्याचे विषय झाले आहेत. गुन्हा घडला, की पोलिस जातात, गुन्हे दाखल करतात मग संशयितांचा शोध सुरू होतो. पोलिस अधीक्षक, अप्पर अधीक्षक पाहणी करतात. पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थितीवर काम सुरू होते. गेल्या आठवडाभरात एमआयडीसी पोलिस ठाण्यांतर्गत कुरेशी-पिरजादे दंगल, गवळी-सिक्कलगर दंगल, गँगवॉर, दोन चाकू हल्ल्यांचे गुन्हे अलीकडेच घडले आहेत. 

महामार्गावर गुंडाराज 
कुसुंबा येथील अंत्ययात्रेतून परतत असताना किरण शंकर खर्चे याच्या टोळीने विशाल राजू अहिरे याला हॉटेल निलांबरीजवळ गाठले. त्याच्या सोबतचे एक-दोन जण पळून गेले. मात्र खर्चेच्या मित्रांनी तब्बल सव्वा तास महामार्ग रोखत अहिरेला मारण्यासाठी तमाशा उभा केला. या दरम्यान मोठ-मोठे दगड खाली पडलेल्या अहिरेच्या मांड्यांवर टाकण्यात येत होते. त्याला दांडक्याने हजारोंच्या जमावासमोर मारहाण होतानाचा व्हिडिओ व्हॉटस्‌ॲप, फेसबुक, इन्स्टाग्रामवरून व्हायरल होत असून पुणे, मुंबई, नागपूरसारख्या त्याबाबत विचारणा होऊ लागली आहे. 

हल्ल्यानंतर प्रतिहल्ला 
जखमी विशाल अहिरे याला उपचारार्थ डॉ. भंगाळे यांच्या रुग्णालयात दाखल केल्यानंतर अहिरे सोबतच्या तरुणांनी रुग्णालयाच्या आवारातच हल्ला करून प्रतिस्पर्धी टोळीतील एकाच्या पोटात चाकू खुपसला. जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. 

सात अटकेत 
एमआयडीसी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी प्राणघातक हल्ला प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात आशू सुरेश मोरे (१९, एकनाथनगर, रामेश्वर कॉलनी), दीपक लक्ष्मण तरटे (२४, नागसेननगर), किरण शिवाजी गव्हाने (२४, प्रवीण पार्क, रामेश्वर कॉलनी), विशाल भगवान पाटील (२१, मंगलपुरी, रामेश्वर कॉलनी) व छोटा किरण ऊर्फ किरण श्‍यामराव चितळे (२२, सुप्रिम कॉलनी) यांच्यासह सात संशयितांना अटक झाली आहे. 

माहिती दडविण्यासाठी ‘एसपीं’ची तंबी 
संपूर्ण जिल्ह्यात घडणारे गुन्हे, अपघाताची माहिती अधिक्षक कार्यालयातील वाचक शाखेत संकलित होते. ही माहिती आयजी, डीआयजी, महासंचालक कार्यालयासह गृहमंत्रालय आणि एनसीआरबीला पाठवली जाते. ती पब्लिक डोमेनमध्ये दर महिन्याला जाहीर होते आणि त्यावरच गुन्हे आढावा बैठका घेतल्या जातात. मात्र, ही माहिती प्रसारमाध्यमांना देऊ नये, अशी तंबीच ‘एसपीं’नी दिल्याने माहितीचे आदानप्रदान होत नसल्याने गुन्ह्यांचा आलेख दडवण्यास मदत होत आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे