
मृतदेह येण्यापुर्वी शुद्ध हरपली; आईला अंतिम दर्शनही नाही, आक्रोश मन हेलावून सोडणारा
मेहुणबारे (जळगाव) : गिरणा पात्रात आंघोळीसाठी गेलेल्या सख्ख्या काका, पुतण्याचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. दुर्देवी घटना आज (ता. २९) सकाळी वरखेडे येथे साडेआठच्या सुमारास घडली. मृतदेह घरी येण्यापुर्वीची बेशुद्ध पडलेल्या आईला मुलाचे अंतिम दर्शनही झाले नाही. (jalgaon-chalisgaon-girna-river-water-child-death-and-family-crying)
वरखेडे (ता. चाळीसगाव) येथील हिरतसिंग जगतसिंग पवार (वय ४१) व मृणाल इंद्रसिंग पवार (वय १८) हे काका-पुतण्या दोघे आज (ता. २९) सकाळी आठच्या सुमारास वरखेडे- लोंढे बँरेज प्रकल्पाच्या खाली गिरणा पात्रात पोहण्यासाठी गेले होते. पोहता पोहता मृणाल याच्या नाकातोंडात पाणी गेल्याने तो गटांगळ्या खात गाळ, दगडांमध्ये अडकला. हा प्रकार लक्षात येताच काका हिरतसिंग यांनी त्याला वाचविण्यासाठी धाव घेतली. मात्र, दोघांच्याही नाकातोंडात पाणी जावू लागल्याने या पात्राजवळ वरखेडे गावातील कपडे धुण्यासाठी आलेल्या काही महिलांनी हा प्रकार लक्षात येताच गावात जावून सांगितले. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
हेही वाचा: सापाला आपटून-आपटून केले ठार; व्हिडीओ व्हायरल
दोघांनाही काढले बाहेर
हिरतसिंग व मृणाल या दोघांना ग्रामस्थांनी बाहेर काढले व तत्काळ खासगी वाहनाने चाळीसगाव येथे देवरे रुग्णालयात दाखल केले असता डॉ. जयवंत देवरे यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्यानंतर दोघांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले. या घटनेची माहिती मिळताच मेहुणबारे पोलिसांनी घटनास्थळी जावून घटनेचा पंचनामा केला. या प्रकरणी महेंद्र सुभाष पवार यांनी दिलेल्या माहितीवरून मेहुणबारे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गावी आले अन् काळाची झडप
मृत हिरतसिंग पवार हे पुण्यात एका कंपनीत नोकरीला आहेत. दोन दिवसांपूर्वीच गावी वरखेडे येथे आले होते. सहज विरंगुळा म्हणून ते पुतण्यासमवेत वरखेडे बॅरेज पाहण्यासाठी गेले. मात्र, पोहण्याचा मोह न आवरल्याने ते पाण्यात उतरले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे. पतीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची वार्ता कानी पडताच त्यांच्या पत्नी, मुलांसह कुटुंबीयांनी केलेला आक्रोश मन हेलावून सोडणारा होता.
हेही वाचा: जळगाव जिल्ह्यात केवळ २० टक्के लसीकरण
मृणालचा मृत्यू, आईचा टाहो
मृणाल हा नंदुरबार येथे अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. आठ दिवसांपूर्वीच तो वरखेडे गावी आला होता. मंगळवारी सकाळीच तो काकाबरोबर पोहण्यासाठी गेला. मात्र, एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. मृत मृणालला आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. त्याचे वडील इंद्रसिंग पवार हे एस.टी. महामंडळात नोकरीला आहेत. मृणाल हा त्यांचा मोठा मुलगा होता. त्याच्या मृत्यूची वार्ता कानी पडताच आईने एकच टाहो फोडला. मृणाल व काकाचा मृतदेह गावात आल्यानंतर आई बेशुद्ध झाली. त्याठिकाणी तत्काळ डॉक्टर आले. परंतु आईने ‘मुलाचा चेहरा पाहू द्या हो’, असे म्हणत आक्रोश केला. हे विदारक दृष्य पाहून उपस्थितांचे अक्षरश: डोळे पाणावले होते.
सायंकाळी जाणार होते पुण्याला
मृत हिरतसिंग पवार हे कुटुंबासह दोन दिवसांपूर्वी मूळगावी वरखेडे येथे आले होते. तर त्यांचा भाऊ इंद्रसिंग पवार यांचे कुटुंबही नंदुरबारहून वरखेडे गावी आले होते. दोन्ही भावांचे कुटुंब काही दिवस का होईना एकत्र आल्याने पवार कुटुंबीयात आनंदी आनंद होता. हिरतसिंग पवार हे पुण्याला मंगळवारी (ता. २९) सायंकाळी कुटुंबासह रवाना होणार होते. मात्र, त्यापूर्वीच दुर्देवी घटना घडली.
Web Title: Marathi News Jalgaon Chalisgaon Girna River Water Child Death And Family
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..