नववर्षात जळगावातील ‘रास्ते चमकेंगे ? जीवन खिलेंगे..!

सचिन जोशी
Monday, 4 January 2021

जळगाव शहरासह जिल्ह्यातील समस्यांची दहशतही कोरोनासारखीच जीवघेणी. तीन वर्षांपासून रखडलेले अमृतचे काम.

’ जळगाव ः एका रेडिओ एफएम चॅनलवर ‘मास्क हटेंगे.. खुबसुरत चेहरे खिलेंगे...’ ही कोरोनामुक्तीचा सकारात्मक संदेश देणारी जाहिरात मधूनमधून ऐकायला मिळते, त्यातून आशेचा किरणही दिसू लागतो. गेल्या वर्षानं जळगाव शहरासह जिल्ह्यालाही स्थानिक स्तरावर रस्ते, गटार, स्वच्छता, महामार्ग, पुलांच्या रखडलेल्या कामांचे विदारक अनुभव दिलेत. या वर्षात या अनुभवांच्या कटू स्मृती जातील. मग, ‘रास्ते चमकेंगे... जीवन खिलेंगे..!’, अशी अपेक्षा करायला काय हरकत? अर्थाच, ही कामे मार्गी लागण्यासाठी स्वाभाविकत: लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांचे ‘लसीकरण’ व्यापक पातळीवर राबवावे लागेलच. 

सरत्या वर्षाने कोरोनाची दहशत, लॉकडाउनचे जीवघेणे दुष्परिणामांच्या कटू स्मृती दिल्या असल्या तरी वर्षभरात अनेक चांगल्या गोष्टीही या साथरोगाने व त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने शिकविल्या. वर्षभरात प्रयत्नपूर्वक एखाद्या रोगावर लस विकसित करण्याचा विक्रमही या वर्षी संशोधक, वैज्ञानिकांनी करून दाखविला अन्‌ नव्या दशकातील नव्या वर्षाच्या प्रारंभीच विविध टप्प्यातील पाच-सहा लसींची भेट मानवजातीला देत ‘अंधकारातून प्रकाशाकडे...’ असा संदेशही अधोरेखित केला. 
जळगाव शहरासह जिल्ह्यातील समस्यांची दहशतही कोरोनासारखीच जीवघेणी. तीन वर्षांपासून रखडलेले अमृतचे काम, सुमारे दशकपासून प्रलंबित महामार्ग चौपदरीकरणाचे प्रकल्प, वर्षानुवर्षे ठप्प पडलेले सिंचन प्रकल्प अशा एक ना अनेक समस्या कोरोनासारख्याच जिल्ह्यावर घोंगावताय. त्या पूर्णही होत नाही आणि त्यामुळे निर्माण झालेली स्थितीही सुधारत नाही, अशी अवस्था आहे. अमृतच्या कामामुळे जळगाव व भुसावळ शहरातील रस्ते, वस्त्यांची वाट लागून भग्न झालेली ही शहरं, फागणे- तरसोद, औरंगाबाद- जळगाव महामार्गाच्या चौपदकरणाअभावी होणारी वाहनधारकांची जीवघेणी फरफट यामुळे कोरोनाच्या प्रमुख लक्षणासारखीच श्‍वास गुदमवणारी आहेत. 

चौपदरीकरण, अमृत योजनेंतर्गत होणारी पाणीपुरवठा व भुयारी गटारांच्या कामांना निधी याआधीच मंजूर व उपलब्धही आहे. असे असताना ही कामे रखडणे दुर्दैवी आणि चिंताजनकही आहे. विकासकामे पूर्ण होत नाही, ही या कामांची एक बाजू झाली. मात्र, त्याचे दुष्परिणाम जळगाव जिल्ह्यातील लाखो लोकांना भोगावे लागताय. अमृतच्या कामांमुळे तर सहा लाख जळगावकर आणि अडीच लाखांवर भुसावळकरांच्या नशिबी आलेल्या नरकयातनांची तर तुलनाच होऊ शकत नाही. जिल्ह्याचे पालक म्हणवणारे मंत्री, नेते म्हणविणारे लोकप्रतिनिधी आणि स्थानिक प्रशासन या समस्या आणि कामांबाबत अजिबात गंभीर नाही. 
नववर्षाचे स्वागत करताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. पण, या तोंडी तत्त्वज्ञानानं ना लस येणार, ना कोरोना जाणार. लस येऊन तिला नागरिकांपर्यंत पोचवावे लागेल तेव्हा चेहरे उजळतील, खुलतील... तद्वतच अमृत, चौपदरीकरण, भुयारी गटार, रस्ते, उड्डाणपूल, सिंचन प्रकल्पांची कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्नांच्या लसींचे डोस लागतील. त्यासाठी केवळ स्वार्थासाठी बोंब मारून चालणार नाही, तर राजकीय धुरिणांना नागरिकांसाठी काही करतोय, हे सिद्ध करावे लागेल. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon citizens expect road repairs city new year