शहर अनलॉक, रस्ते ‘लॉक’...अन्‌  ‘नो व्हेइकल झोन’ने वाहतूक  ब्लॉक’!

शहर अनलॉक, रस्ते ‘लॉक’...अन्‌  ‘नो व्हेइकल झोन’ने वाहतूक  ब्लॉक’!

जळगाव  : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जळगाव शहरात लागू केलेला लॉकडाउन सोमवारी संपला. शहर अनलॉक करताना प्रशासनाने मध्यवर्ती बाजारपेठेचा भाग ‘नो व्हेइकल झोन’ जाहीर केला. फुले मार्केट, गांधी मार्केट, गोलाणी संकुल, दाणा बाजार, सराफ बाजार, बोहरा बाजार आदी गर्दीच्या ठिकाणी जाणारे सर्व रस्ते ‘लॉक’ केले. त्यामुळे या क्षेत्राला लागून सर्वच रस्त्यांवर वाहनांची मोठी गर्दी झाली. त्यामुळे रस्ते ‘लॉक’ अन्‌ वाहतूक ‘ब्लॉक’ अशी स्थिती झाली. दरम्यान, अनलॉकमध्ये व्यवसाय सुरू होण्याची अपेक्षा असल्याने मार्केटमधील व्यावसायिकांचा हिरमोड झाल्याने संतप्त व्यापाऱ्यांनी पोलिस ठाण्याबाहेर गोंधळ घातला. 

मंगळवार (ता. १४)पासून जळगाव शहर अनलॉक झाले. यात संकुलातील दुकानांना परवानगी मिळाली नाही. उलटपक्षी मध्यरात्री प्रशासनाने न्यायालय चौकाकडून चित्रा चौकाकडे जाणाऱ्या मार्गावरील गोलाणी मार्केटचे हनुमान मंदिर, चित्रा चौक, कोंबडी बाजार, पुष्पलता बेंडाळे चौक, पेट्रोलपंप, जुने जळगावाकडील सराफ बजाराच्या गल्ल्या, भिलपुरा पोलिस चौकीपासून ते थेट शहर पोलिस ठाण्यापर्यंतचा परिसर एका बाजूने पत्रे ठोकून बंद केला. बाजारपेठेत गर्दी नको, म्हणून हे रस्ते लॉक करताना या भल्या मोठ्या परिसरात नागरिकांचा रहिवासही आहे, याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. 

बाजारपेठच प्रतिबंधित क्षेत्र 
मुख्य बाजारपेठेकडे जाणारे सर्वच रस्ते बंद केले. या संपूर्ण परिसरालाच प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) करून टाकले. त्यामुळे या भागात गर्दी टळली. मात्र, लगतच्या रस्त्यांवर प्रचंड गर्दी झाली. त्यामुळे ‘नो व्हेइकल झोन’च्या उद्देशालाच हरताळ फासला. 

व्यापाऱ्यांचा गोंधळ 
फुले व केळकर मार्केटच्या व्यापारी संकुलातील व्यावसायिकांनी गर्दी करून शहर पोलिस ठाण्यासमोर तासभर गोंधळ घातला. पोलिसांनी त्यांची समजूत घालून गर्दी पांगविली. 

तहसीलदारही अडकल्या... 
सकाळी बाहेर पडलेल्या नागरिकांना वाहने काढण्यासाठी कसरत करावी लागली. ठिकठकाणी वाहतुकीचा खोळंबा झाला होता. या कोंडीत तहसीलदार वैशाली हिंगे यांचे वाहनही अडकले होते. अखेर चालकाने मोठी कसरत करत वाहन वळवून वेगळ्या मार्गाने काढले. 

आज दुकाने उघडू देण्याची अपेक्षा होती. मात्र, तीही मावळली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेत व्यापाऱ्यांनी त्यांच्या समस्या मांडल्या आहेत. त्यांनी आम्हाला आश्‍वस्त केले आहे. 
-दीपक कुकरेजा, व्यापारी गोलाणी मार्केट 

चार महिने व्यवसाय बंद आहेत. बँकेचे हप्ते थकले. होते तेवढे पैसे संपले, उधारी करून घरखर्च भागवतोय. कोरोनापेक्षा आता उपासमारीने मरण्याची वेळ आली आहे. 
-अल्ताफ भिस्ती, शाहू मार्केट  

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com