esakal | जळगाव जिल्हा रुग्णालय:रुग्णसेवेच्या नावाखाली दलालांचा सुळसुळाट
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon District Hospital

जळगाव जिल्हा रुग्णालय:रुग्णसेवेच्या नावाखाली दलालांचा सुळसुळाट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्‍हा रुग्णालयात (District Hospital) दाखल महिलेस पलंग मिळवून देण्यासाठी पैशांची मागणी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र, दाखल महिलेने दोन दिवसांपूर्वीच एका तरुणाला पाचशे रुपये दिल्याचे सांगताच काही तरुणांनी संबंधिताला जिल्हा रुग्णालयात बोलावून मारहाण (Beating) करून पोलिसांच्या (Police) स्वाधीन केले. परंतु आपण संबंधित महिलेच्या रुग्णाला रक्तदान (Blood Donation) केल्याने आपल्याला खर्चाला म्हणून पाचशे रुपये दिल्याचे त्याने निरीक्षक रामदास वाकोडे यांना सांगितले.

हेही वाचा: ‘दिशा’समितीची बैठक;शेतकऱ्यांची वीज कापल्याने लोकप्रतिनिधी संतप्त


जिल्हा रुग्णालयात बेड (पलंग) उपलब्ध नसल्यामुळे गेल्या अठरा महिन्यात जिल्ह्यातील अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. रुग्णालयात ‘पलंग’ मिळत नसल्याचा इतका बोभाटा झालाय, की रुग्णालय आवारात रुग्णसेवेच्या नावाखाली फिरणारे दलाल गोरगरीब व ग्रामीण भागातील जनतेची अक्षरशः लूट करीत असल्याचा गंभीर प्रकार यानिमित्ताने समोर आला आहे. मंगळवारी दुपारी चार वाजता विक्की अडकमोल नावाच्या तरुणाला बेदम मारहाण करून काही लोकांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात जमा केले. महिलेला रुग्णालयात पलंग मिळवून देण्यासाठी या तरुणाने पैसे उकळल्याने त्याला मारझोड करण्यात आल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. मात्र, परिस्थिती वेगळीच असल्याचे समोर आले.

काय आहे नेमका प्रकार :

जिल्हा रुग्णालयात दाखल महिलेला येथील काही तरुणांनी पलंग मिळवून देतो यासाठी पैशांची मागणी केली. तेव्हा त्या महिलेने ‘मी त्या भाऊला पाचशे रुपये दिले होते’ असे सांगितल्यावर पाचशे रुपये घेणाऱ्याला बोलवण्यात येऊन रुग्णालयातच यथेच्छ धुलाई करण्यात आली. आम्ही असताना तू कोण आला पैसे घेणारा या तोऱ्यात तेथील तरुणांनी संबंधिताला मारहाण केल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यातील ५ लाख बालकांना लवकरच मिळणार कोराना लस..

तो तरुण निघाला वायरमन :

विक्की अडकमोल (रा. जामनेर) याची चौकशी केल्यावर, तो जामनेर विद्युत विभागात तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहे. तीन- चार दिवसांपूर्वी तो, गावातील एक रुग्ण घेऊन जळगावी आला होता. तेव्हा भोई नावाच्या एका महिलेसोबतच्या रुग्णाला त्याने रक्त दिले होते. त्या महिलेने मदत केली म्हणून पाचशे रुपये खर्चाला दिल्याचे त्याने निरीक्षक रामदास वाकोडे यांना चौकशीत सांगितले. जामनेरमधून आपण व्याजाने पैसे घेतले होते. आता आपल्याकडून एक लाखाची मागणी होत असल्याचे विक्कीने सांगितले. महिन्यापासून कामाला जात नसल्याचेही त्याने सांगितले. निरीक्षक वाकोडे यांनी जामनेर येथील विद्युत विभागात फोन करुन खात्री केल्यावर विक्कीने दिलेली माहिती खरी निघाली. विक्की अडकमोल या तरुणाची चौकशी करुन त्याला समज देण्यात आली. तसेच पोलिस कर्मचाऱ्याला सांगून त्याचे तिकीट काढत जामनेर बसमध्ये बसवून देण्यात आले. दरम्यान, जिल्हा रुग्णालय तथा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना घडल्या प्रकाराबाबत माहिती घेण्यासाठी संपर्क केला असता नेहमीप्रमाणे प्रतिसाद मिळाला नाही.

loading image
go to top