वाळूमाफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी कलेक्टर-एसपींचा ‘मास्टर प्लॅन’  

रईस शेख
Tuesday, 24 November 2020

दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी नाकाबंदी करण्यात येऊन तपासणी करण्यात आली. यात रात्रीच्या वेळी वाळूच्या वाहनांवर कारवाई करण्यात आली.

जळगाव : जिल्ह्यात अवैध वाळूउपशासह बेकायदा वाहतूक सुरूच असून, जिल्‍हा प्रशासनासह पोलिस दल आजवर वाळूमाफियांना लगाम घालू शकलेले नाही. भरारी पथके, बंदोबस्त, नाकाबंदी लावूनही गिरणेची लूट बिनबोभाट सुरूच असून, अधिकृत ठेके बंद असतानाही गिरणा नदीपात्रातून अपरिमित उपसा केला जात आहे. हा सर्व प्रकार रोखण्यासाठी व वाळूमाफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी स्वत: जिल्‍हाधिकारी अभिजित राऊत आणि जिल्‍हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी अचानक नदीपात्रात उतरून पाहणी केली व परिस्थितीचा आढावा घेतला. 

आवश्य वाचा- चोरीच्या वाळूला सोन्याचा ‘दर’!

जिल्हाभरातील वाळू गटांचा लिलाव झालेला नाही. असे असतानाही मोठ्या प्रमाणावर गिरणा नदीपात्रातून वाळूचे उत्खनन व त्याची अवैध वाहतूक रात्रंदिवस सुरूच आहे. दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी नाकाबंदी करण्यात येऊन तपासणी करण्यात आली. यात रात्रीच्या वेळी वाळूच्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. संबंधितांवर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. अवैध वाळू वाहतुकीवर कायमचा आळा बसावा व महसुलात वाढ व्हावी, असे आदेशही नुकतेच विभागीय आयुक्तांकडून जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. तसेच अवैध वाळू वाहतुकीबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे काही तक्रारीही प्राप्त झाल्या होत्या. 

परिसर काढला पिंजून 
जिल्हाधिकारी राऊत, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मुंढे यांनी अचानक गिरणा नदीपात्रात उतरून खेडी, आव्हाणे तसेच निमखेडी या शिवारांमध्ये पाहणी केली. नेमका कुठून व कशा पद्धतीने वाळूउपसा होतो, कोणत्या मार्गाने वाहने नदीपात्रात उतरतात व वाळू भरल्यानंतर कोणत्या चोरट्या मार्गांनी वाहतूक करतात, याबाबत माहिती घेतली. या वेळी प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार नामदेव पाटील, तलाठी यांचीही उपस्थिती होती.

आवर्जून वाचा- धागा धागा जोडत लावला ‘लेफ्टनंट’चा स्‍टार  

 

नदीत दिसले वाळूचे डंपर

जिल्हाधिकाऱ्यांना नदीपात्रात काही डंपरही दिसून आले. मात्र, त्यात वाळू नव्हती. याबाबत संबंधित पोलिस ठाण्याला कारवाईच्या सूचना करण्यात आल्या आहेत, असे जिल्हाधिकारी यांनी बोलताना सांगितले. तसेच लवकरच मोठी कारवाई होणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.

 

संपादन- भूषण श्रीखंडे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon collector-SP's 'master plan' to catch sand mafia