‘नो मास्क नो विक्री’ नाही तर पुन्हा लॉकडाऊन होणार; जिल्हाधिकारींचा इशारा ! 

देविदास वाणी
Saturday, 21 November 2020

कोरोना बचावासाठी मास्क हाच प्रमुख उपाय आहे. त्यामुळे दुकानात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना मास्क लावणे बंधनकारक करा. मास्क लावण्याची शिस्त स्वत:पासून लावा.

जळगाव ः कोरोनाचे रुग्ण संख्या वाढत आहे. यामुळे व्यापाऱ्यांनी ‘नो मास्क नो विक्री’ असे सूत्र लक्षात ठेवा. रुग्ण संख्या वाढली तर पुन्हा लॉकडाउनची वेळ येवू शकते. यामुळे व्यापाऱ्यांनी मास्क लावा, मास्क न घातलेल्या ग्राहकांना मालाची विक्री करू नका. जर रुग्ण संख्येने मर्यादा ओलांडली तर मला जिल्हा लॉकडाऊन करावा लागेल असा इशारा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी व्यापारी बांधवांना दिला आहे. 

वाचा- अजबच..स्‍वतःवर कारवाई करण्याचे पत्र काढले

दिवाळीनंतर बाजारपेठेत प्रचंड गर्दी होत आहे. शासनाने कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. लस अजून उपलब्ध झालेली नाही. यामुळे खबरदारी हाच एकमेव उपाय आहे. याचदृष्टीने जिल्हाधिकारी राऊत यांनी व्यापारी संघटनांच प्रतिनिधींची बैठक घेतली. उपायुक्त संतोष वाहुळे, महात्मा फुले, सेंट्रल फुले, गोलाणी मार्केट, नाथ प्लाझा, दाणाबाजार, सराफा असोसिएशन आदी संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते.यात सेंट्ल फुले मार्केट अध्यक्ष रमेश मताणी, बबलू समडिया, फुले माकेटचे बाबुभाई कौराणी, राजेश वरयानी, सराफ बाजाराचे स्वरूप लुंकड, गोलाणी माकेट महेश चावला, पिन्टू लुल्ला, दिपक कुकरेजा, महात्मा गांधी मार्केटचे प्रदीप मोमाया अन्य व्यापारी उपस्थित होते. 

इयत्ता नववी ते बारावीची शाळा सुरू होणार असल्याने महापालिकेच्या कोविड तपासणी केंद्रावर शिक्षकांची गर्दी उसळली. दिवसभरात ७०० शिक्षकांची टेस्ट करण्यात आली. प्रशासनाच्या अहवालानुसार शहरात नवीन १२ रूग्ण आढळून आहे. 

मास्क नसेल तर माल विकू नका 
कोरोना बचावासाठी मास्क हाच प्रमुख उपाय आहे. त्यामुळे दुकानात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना मास्क लावणे बंधनकारक करा. मास्क लावण्याची शिस्त स्वत:पासून लावा, ग्राहकांसोबतच कामगारांनाही ते नियम लागू करा.‘नो मास्क नो विक्री’ याची अंमलबजावणी केल्यास ग्राहकांना शिस्त लागेल व सर्वाची सुरक्षितता ठेवणे शक्य हाेईल. दुकानात ग्राहकांची गर्दी होऊ देऊ नका, असा सुचना जिल्हाधिकारी राऊत यांनी दिल्या. 

आवश्य वाचा- सुटीत फिरण्याचे निमित्‍त पडले महागात; दरीत कोसळून महिलेचा मृत्‍यू
 

कंत्राटी कर्मचाऱ्यांना मुदत वाढ 
जिल्ह्यात कोरोनाच्या लढाईसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीला दिलेली मुदतवाढ संपली. प्रशासनाने त्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. कोरोना संसर्ग वाढल्याने शासकीय आरोग्य यंत्रणेचे मनुष्यबळ अपूर्ण पडत असल्याने विविध पदासाठी कंत्राटीतत्वावर २०० कर्मचाऱ्यांची तीन महिन्यांसाठी नियुक्ती केली होती. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon collector warns traders to lockdown again