बी.एच.आर. प्रकरण; कंडारेच्या गुप्त बैठकांची चालकाला संपूर्ण माहिती 

रईस शेख
Wednesday, 2 December 2020

झंवर यांच्या घरी सापडलेली शासनाची वेगवेगळी कागदपत्रे दस्तऐवज आणि अधिकाऱ्यांचे बनावटी शिक्के कोठे वापरले हेदेखील त्याच्या माहिती असणे अपेक्षित आहे.

जळगाव  : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेमधील गैरव्यवहारातील संशयित जितेंद्र कंडारे याचा वाहनचालक कमलाकर भिकाजी कोळी याला रविवारी (ता. २९) जळगावातून अटक झाली. त्याला पथकाने पुणे न्यायालयात हजर केल्यावर इतर चौघांसह त्यालाही ६ डिसेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली असून, तो तपासात कुठलेच सहकार्य करत नसल्याचे तपास पथकाचे म्हणणे आहे. कंडारेच्या एकूणएक भेटींसह काळ्या कारनाम्याची इत्थंभूत माहिती त्याला असून, त्याचे तोंड उघडण्याची प्रतीक्षा आहे. 

वाचा-  शहरातील रस्ते दुरुस्तीचा कोट्यवधींचा खर्च गेल्या खड्ड्यात 

 

कोळीला रविवारी सकाळी बीएचआरच्या मुख्य शाखेत वाहन लावण्यासाठी आला असताना पथकाने ताब्यात घेतले. जळगावातून त्याच्याच सोबत कंडारे नगरला गेला होता. मात्र, शुक्रवारीच छापेमारी झाल्याची माहिती त्याला कळाल्याने तो, जळगावी परतलाच नाही. रविवारी कोळीने संधी साधून पतसंस्थेच्या मुख्य शाखेत वाहन लावून पळण्याच्या प्रयत्नात असताना त्याला ताब्यात घेऊन पथकाने पुण्याला नेले. त्याने पोलिसांना सांगितले, की मी कंडारे यांना औरंगाबाद ते नगरच्या दरम्यान सोडले. कंडारेला नेमके कुठे सोडले, याबाबत पोलिसांनी विचारले असता, त्याने समाधानकारक माहिती दिली नाही. पोलिसांनी त्याला पुणे न्यायालयात हजर केल्यावर ६ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली असून, त्याने अद्यापही तोंड उघडलेले नाही. 
 

कोळीला जास्तच माहिती 
कमलाकर कोळी हा जितेंद्र कंडारेच्या सर्वांत विश्‍वासूंपैकी एक असून, महाराष्ट्रासह बीएचआरच्या नऊ राज्यात असलेल्या शाखांमध्ये त्याच्यासोबत येणे-जाणे झालेले आहे. याचबरोबर कंडारे जळगावात कोणाच्या संपर्कात अधिक होता, बैठका कोणासोबत होत असत, कुठल्या मालमत्ता विक्री झाल्या, पैसा कोठून भेटला अशी माहिती त्याच्याजवळ असण्याची शक्यता आहे. अनेक व्यवहार त्याच्या डोळ्यादेखत झालेले आहेत. असे असतानाही तो पोलिस पथकाला कुठलेच सहकार्य करीत नाही. 

आवश्य वाचा-  महाआघाडी कागदावर; भाजप निकालात ‘स्ट्राँग’ 

कंडारे-झंवर यांची गट्टी.. 
कमलाकर कोळीने प्राथमिक चौकशीत सांगितले, की कंडारे हे वारंवार सुनील झंवर यांना भेटत होते. त्यामुळे झंवर यांच्या घरी सापडलेली शासनाची वेगवेगळी कागदपत्रे दस्तऐवज आणि अधिकाऱ्यांचे बनावटी शिक्के कोठे वापरले हेदेखील त्याच्या माहिती असणे अपेक्षित आहे. दरम्यान, कमलाकर कोळी पाहिजे असलेल्या संशयित आरोपींपैकी प्रकाश वाणी, कुणाल शहा या चांडाळ चौकडीला ओळखत असल्याचे त्याने चौकशीत सांगितले. मात्र, सद्यःस्थितीत त्याच्याबाबत कुठलीच माहिती तो देत नाही. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon complete information to the driver of kandare's secret meetings