शेतकऱ्यांचा घात हाणून पाडणार 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 3 November 2020

प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, स्वाक्षरी अभियानाचे निरीक्षक असलेले प्रकाश मुगदिया यांनी शहर काँग्रेसकडून प्रभागनिहाय स्वाक्षरी अभियानात ५० हजार सह्यांचे उद्दिष्ट दिले आहे.

जळगाव : केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी विधेयक शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे आहे. मोदी सरकारची शेतकऱ्यांची घात करण्याची शक्कल काँग्रेस हाणून पाडणार असल्याने प्रदेश काँग्रेसकडून राष्ट्रपतींना दिल्या जाणारे विधेयक रद्द करण्याच्या स्वाक्षरी मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय युवक काँग्रेस व एनएसयूआयचे राष्ट्रीय समन्वयक योगेंद्रसिंग पाटील यांनी केले. शहरात सुरू असलेल्या स्वाक्षरी अभियानाच्या शाहूनगर भागातील कॉर्नर सभेत ते बोलत होते. 
प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, स्वाक्षरी अभियानाचे निरीक्षक असलेले प्रकाश मुगदिया यांनी शहर काँग्रेसकडून प्रभागनिहाय स्वाक्षरी अभियानात ५० हजार सह्यांचे उद्दिष्ट दिले आहे. जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. अविनाश भालेराव, कार्यक्रमप्रमुख प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनात युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल बाहेती, शहर काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष श्याम तायडे, नदीम काझी, काँग्रेसचे माजी महानगर सरचिटणीस विजय वाणी, पंचायतराजचे माजी जिल्हाध्यक्ष विवेक ठाकरे, अनुसूचित जाती-जमाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे, भुसावळ शहर सरचिटणीस इस्माईल गवळी, युवक काँग्रेसचे मुक्तदीर (बाबा) देशमुख, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मुजीब पटेल, शहर सरचिटणीस परवेज पठाण, अल्पसंख्याक शहराध्यक्ष अमजद पठाण, प्रदीप तायडे, जगदीश गाढे, ज्ञानेश्वर कोळी, जाकीर बागवान आदी पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण शहरात वॉर्डनिहाय घरोघरी केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधातील विधेयकाची माहिती देत स्वाक्षरी मोहीम चालविली आहे. दरम्यान, शाहूनगर भागात झालेल्या या कार्यक्रमावेळी माजी नगरसेवक फारूख शेख, नईम साहील, आदिल शेख यांनी घरोघरी जाऊन कृषी विधेयकाच्या नुकसानीची माहिती देत नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon congress signature abhiyan in farmer