esakal | बांधकामाच्या 70 टक्के साइट्‌स सुरू...परप्रांतीय मजूरही परतू लागले !
sakal

बोलून बातमी शोधा

बांधकामाच्या 70 टक्के साइट्‌स सुरू...परप्रांतीय मजूरही परतू लागले !

जळगाव शहरासह जिल्ह्यात बांधकाम या पायाभूत सुविधा कामाच्या साइट्‌सवर काम करणारे, तसेच त्यासंबंधी उद्योगावर अवलंबून असे जवळपास एक लाखापेक्षा अधिक कामगार आहेत.

बांधकामाच्या 70 टक्के साइट्‌स सुरू...परप्रांतीय मजूरही परतू लागले !

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव ः लॉकडाउनचे तीन महिने उलटल्यानंतर अर्थचक्र रूळावर येऊ लागले आहे. बांधकाम क्षेत्रातील मजूर, कामगारही जवळपास दोन-अडीच महिने घरी होते. ते कामावर परतल्याने जळगाव शहर व जिल्ह्यातील हजारो बांधकाम साइट्‌स सुरू झाल्या आहेत. स्थानिक कामगारांवर मदार असलेल्या साइट्‌स जवळपास पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या असून, परप्रांतीय मजूरही कामावर परतू लागले आहेत. 


कृषी व कृषीपूरक उद्योगानंतर देशाच्या अर्थव्यवस्थेत दुसऱ्या क्रमांकाचे असलेल्या बांधकाम व पायाभूत सुविधा क्षेत्राला लॉकडाउनचा मोठा फटका बसला. लॉकडाउनमधून कृषी व कृषीपूरक उद्योगांना वगळले होते. त्यामुळे तुलनेने या क्षेत्राला कमी फटका बसला, तरी अन्य व्यवसाय, उद्योगांप्रमाणे बांधकाम, पायाभूत सुविधांचे क्षेत्र पूर्णतः "लॉक' झाले होते. 

लाखावर कामगार 
जळगाव शहरासह जिल्ह्यात बांधकाम या पायाभूत सुविधा कामाच्या साइट्‌सवर काम करणारे, तसेच त्यासंबंधी उद्योगावर अवलंबून असे जवळपास एक लाखापेक्षा अधिक कामगार आहेत. त्यापैकी जवळपास 20 टक्के परप्रांतीय कामगार आहेत. त्यात प्रामुख्याने फिनिशिंग, सुतारकाम करणारे मजूर असून, त्यातील बहुतांश राजस्थानचे आहेत. काही प्रमाणात उत्तर प्रदेशातील कामगारही आहेत. एप्रिल व मे, असे संपूर्ण दोन महिने हे कामगार बेकार होते. परप्रांतीय कामगार त्यांच्या गावी निघून गेले. 

जळगावात दोनशेवर साइट्‌स 
मोठे पोटेन्शिअल असलेले जळगाव शहर असून, साडेपाच-सहा लाख लोकसंख्या असली तरी शहरात बांधकाम क्षेत्र बऱ्यापैकी विकसित झाले आहे. शहराच्या विविध भागांत बांधकामाच्या जवळपास दीडशे-दोनशे साइट्‌स सुरू आहेत. त्याठिकाणी 30 ते 40 हजार कामगार कामे करतात. लॉकडाउननंतर जूनपासून बहुतांश साइट्‌स सुरू झाल्या आहेत. 

बहुतांश कामगार हजर 
बांधकाम साइट्‌सवर बहुतांश कामगार स्थानिक आहेत. अगदी पाया खोदण्यापासून कोबा करणारे, सेंट्रिंग, प्लॅस्टर, स्लॅब आदी कामे स्थानिक मजुरांकडूनच केली जातात. टाइल्स, ग्रॅनाइट- मार्बलचे फिनिशिंग वर्क, फर्निचर आदी सुतारकाम करणारे मजूर परप्रांतीय आहेत. कोरोनामुळे त्यांच्या प्रांतात गेलेली ही मंडळी अद्याप परतलेली नाही. त्यापैकी 25 टक्के मजूर परत आल्याचे सांगितले जाते. मात्र, स्थानिक सर्व कामगार आपापल्या कामावर हजर झाले आहेत. 

शहरातील साइट्‌स : 175 
बांधकाम व्यावसायिक : 70 
स्थानिक कामगार : 40 हजारांवर 
परप्रांतीय मजूर : सात ते आठ हजार 
सध्या हजर कामगार : सुमारे 80 टक्के