जळगावकरांसाठी दिलासादायक; कोरोनाचे ॲक्टिव्ह रुग्णाची होतेय घट 

जळगावकरांसाठी दिलासादायक; कोरोनाचे ॲक्टिव्ह रुग्णाची होतेय घट 

जळगाव  : जिल्ह्यात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना संसर्गात गेल्या काही दिवसांपासून प्राप्त होणारे आकडे थोडा दिलासा देणारे आहेत. गेल्या आठ- दहा दिवसांत बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, त्यामुळे या दहा दिवसांत ॲक्टिव्ह रुग्ण तब्बल हजाराने घटले आहेत. परिणामी, ऑक्सिजन व आयसीयू बेड्‍सवरील ताणही काही प्रमाणात कमी झाल्याचे चित्र आहे. 

जिल्ह्यात ऑगस्ट- सप्टेंबरमध्ये कोरोनाचा संसर्ग भयानक पद्धतीने वाढला. या दीड महिन्यात तब्बल वीस हजारांवर रुग्ण वाढले. सप्टेंबरचा पहिला पंधरवडाही रुग्णसंख्या वाढीच्या दृष्टीने घातक ठरला. 

दहा दिवसांत सात हजार बरे 
गेल्या दहा- बारा दिवसांपासून दररोज वाढणाऱ्या रुग्णांसोबतच बरे होणाऱ्यांची संख्याही लक्षणीयरीत्या वाढतेय. दररोज बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडे नव्या बाधितांप्रमाणेच पाच-सहाशे- आठशेपर्यंत पोहोचला आहे. गेल्या दहा दिवसांत, म्हणजे १४ ते २३ सप्टेंबरदरम्यान तब्बल साडेसात हजार रुग्ण बरे झाले. 

ॲक्टिव्ह रुग्णांत घट 
एकीकडे नव्या बाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये होणारी वाढ अथवा हे दोन्ही आकडे जवळपास बरोबरीत राहत असल्याने ॲक्टिव्ह रुग्णांमध्येही बऱ्यापैकी घट झाली आहे. त्यामुळे एकूणच सप्टेंबरचा विचार केला, तर दुसऱ्या पंधरवड्यात ॲक्टिव्ह रुग्ण सातत्याने कमी होत आहे. याच महिन्यात १३ तारखेला सर्वाधिक म्हणजे १० हजार ११६ ॲक्टिव्ह रुग्ण होते, नंतर ते थोडे कमी होऊन पुन्हा १७ सप्टेंबरला १० हजार १११ ॲक्टिव्ह रुग्ण होते. तीच संख्या गेल्या पाच-सात दिवसांत सातत्याने घटून २३ सप्टेंबरला नऊ हजार १२२ वर आली आहे. म्हणजे या आठवडाभरात ॲक्टिव्ह रुग्ण हजाराने कमी झाले. 

ऑक्सिजन, आयसीयूवरील ताण कमी 
सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात १३, १४ तारखेपासून बरे होणारे रुग्ण वाढू लागले. गेल्या सहा दिवसांत तर बरे होणाऱ्यांची संख्या नव्याने बाधितांपेक्षा जास्त दिसून येत आहे. त्यामुळे ॲक्टिव्ह रुग्ण जसे कमी होत आहेत, तसे ऑक्सिजनची गरज भासणारे व आयसीयूतील रुग्णांची संख्याही घटतेय. सात सप्टेंबरला ७६३ रुग्ण ऑक्सिजनवर होते. त्यात घट होऊन २३ तारखेला ६९६ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. गेल्या दोन महिन्यांतील संसर्ग वाढल्याने आयसीयूतील रुग्णांची संख्याही दीडशेवरून या महिन्यात दोनशेवर व आता तीनशेच्या घरात पोहोचली. १८, १९ तारखेला २९० रुग्ण आयसीयूमध्ये होते, ती संख्या २३ तारखेस २४४ पर्यंत खाली आली आहे. त्यामुळे एकूणच आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत झाली आहे. 

असे आहेत आकडे 
तारीख----ॲक्टिव्ह रुग्ण--ऑक्सिजनवरील-- आयसीयूतील 

१५ सप्टें---९९८९-----------६८४---------२७२ 
१६--------९९९०----------७०६---------२८३ 
१७---------१०१११--------७२८--------२८९ 
१८---------९९९५---------७३२---------२९० 
१९---------९९८५----------७०५--------२९० 
२०----------९८६०---------६६९--------२८७ 
२१-----------९६२२-------७०१---------२८३ 
२२---------९४८३--------६७३--------२५५ 
२३----------९१२२--------६९६-------२४४  
 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com