जिल्ह्यात पाचशेवर रुग्णांचा सलग चौथा दिवस 

जिल्ह्यात पाचशेवर रुग्णांचा सलग चौथा दिवस 

जळगाव  : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक सुरूच आहे. गुरुवारी (ता. १३) सलग चौथ्या दिवशी पाचशेपेक्षा अधिक रुग्ण आढळून आले. नव्या बाधितांच्या ५७४ आकड्यासह एकूण रुग्णसंख्या साडेसोळा हजारांवर पोचली. दिवसभरात ३४४ रुग्ण बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडाही ११ हजार ३०० वर गेला. गेल्या २४ तासांत ११ जणांचा बळी गेल्याने मृत्युसंख्या ६३८ वर पोचली आहे. 


जळगाव जिल्ह्यात ऑगस्टच्या पहिल्या दिवसापासूनच नव्या बाधितांचा आकडे दोन-तीनशे, चारशे आणि आता तर चार दिवसांपासून थेट पाचशेच्या घरात आढळून येत आहे. गुरुवारी सलग चौथ्या दिवशी पाचशेपेक्षा अधिक म्हणजे पावणेसहाशे रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १६ हजार ५३६ झाली आहे. रुग्णवाढीचा वेग असाच राहिला तर जळगाव जिल्ह्यात ऑगस्टमध्येच २० हजारांपेक्षा अधिक रुग्ण असतील. 

जळगाव शहर हॉटस्पॉट 
गुरुवारी दिवसभरात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये एकट्या जळगाव शहरात १६८ रुग्ण आढळले. शहरातील सर्वच भागात रुग्ण आढळून येत असून, आजअखेर शहरातील रुग्णसंख्या तब्बल चार हजारांवर पोचून चार हजार १०० झाली आहे. अन्य ठिकाणीही रुग्ण वाढतच आहेत. ते असे : जळगाव ग्रामीण २४, भुसावळ २२, अमळनेर ८९, चोपडा ६४, पाचोरा २५, भडगाव ९, धरणगाव ३२, यावल २३, एरंडोल ४, जामनेर ३१, रावेर १४, पारोळा ३९, चाळीसगाव २१, मुक्ताईनगर ३, बोदवड १. 

अमळगावात पाचवा बळी 
अमळगाव (ता. अमळनेर) : येथे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे थैमान सुरूच असून, गुरुवारी आणखी एका महिलेचा मृत्यू झाल्याने गावात चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, बाधित मृतांची संख्या पाच झाली आहे. गावात नुकतीच रुग्ण तपासणी झाली होती. त्यात १९ पॉझिटिव्ह आढळून आले होते. 

एकाच कुटुंबात दहा बाधित 
पहूर (ता. जामनेर) : येथे एकाच कुटुंबातील दहा जणांसह एकूण १३ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. रॅपिड टेस्टपैकी सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. पहूर पेठ, पहूर कसबे, सुनसगाव, कळमसरा, नाचणखेडा येथील रुग्णांचा समावेश आहे. गावात एकूण रुग्णसंख्या ११९ झाली आहे. 

जामनेरला १२५ जणांची चाचणी 
जामनेर : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर पालिका व उपजिल्हा रुग्णालय यांच्यातर्फे शहरात शोधमोहीम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत शिबिरात गुरुवारी शास्त्रीनगर, इंदिरा आवास, विवेकानंदनगर, कस्तुरीनगर आणि पुरा भागातील सुमारे सव्वाशेवर नागरिकांनी कोरोना चाचणी करून घेतली. 

पारोळा ग्रामीण भाग व्यापला 
पारोळा : शहरासह ग्रामीण भागात ८७ जणांची रॅपिड टेस्ट करण्यात आली. यात २८ जण कोरोनाबाधित आढळल्याची माहिती प्रशासनाने दिली. गुरुवारी (ता. १३) उंदीरखेडे, मोंढाळे, मोंढाळे पिंप्री, म्हसवेटोळी-शिरसोदे, रवाडे, वाघरे, धुळपिंप्री या भागात बाधित आढळून आले. 

सावखेडासीम परिसरात शिबिर 
चुंचाळे (ता. यावल) : प्राथमिक आरोग्य केंद्र सावखेडासीम (ता. यावल) अंतर्गत कार्यक्षेत्रातील दहिगाव, सावखेडासीम, मोहराळा व महेलखेडी या गावांत कोविड-१९ साठी रॅपिड व आरटीपीसीआर टेस्टसाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर होऊन स्वॅब घेण्यात येत आहेत. यात ११ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या. 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com