जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढतोय  

सचिन जोशी
Thursday, 19 November 2020

दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त होत होती, ती भीती आता खरी ठरु पाहत आहे. 

जळगाव  : कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत असल्याचे चित्र असताना दोन दिवसांपासून पुन्हा एकदा दररोजच्या रुग्णांमध्ये अल्पवाढ झाल्याचे दिसून येत आहे. दोन महिन्यानंतर गुरुवारी प्रथमच बरे होणाऱ्यांपेक्षा रोजच्या नव्या बाधितांचा आकडा अधिक होता. दिवसभरात ६० नवीन रुग्ण आढळून आले, तर ५२ बरे झाले. 

वाचा- जळगाव शहरात रस्ते दुरुस्तीचा सोमवारी पासून 'श्री गणेशा'!

जळगाव जिल्ह्यात दोन महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात असल्याची स्थिती होती. मात्र, दिवाळीपूर्वी व उत्सव काळात मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेर पडल्याने बाजारपेठ प्रचंड गजबजली. त्यामुळे दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त होत होती, ती भीती आता खरी ठरु पाहत आहे. 

रुग्ण पुन्हा वाढले 
बुधवारी व गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील नव्याने बाधित रुग्णांमध्ये अल्पवाढ झाल्याचे दिसून आले. गुरुवारीही जवळपास दोन हजारांवर अहवाल प्राप्त झाले असून त्यात ६० नवीन रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या ५३ हजार ९५१ झाली असून तर ५२ रुग्ण बरे झाले असून एकूण बरे झालेल्यांचा आकडा ५२ हजार २९० वर पोचला आहे. 

जळगावात वाढला संसर्ग 
जळगाव शहरातही संसर्ग पुन्हा वाढत असल्याचे चित्र आहे. शहरात गुरुवारी १६ रुग्ण आढळून आले, तर दिवसभरात १२ बरे झाले. शहरात सध्या १३७ ॲक्टिव रुग्ण आहेत. गुरुवारी प्राप्त अहवालानुसार जळगाव ग्रामीणला ३, भुसावळला ११, अमळनेरला ११, चोपड्यात ५, पाचोरा १, यावल ७, रावेर ३, मुक्ताईनगर १, अन्य जिल्ह्यातील २ असे ६० रुग्ण आढळून आले. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona patient number of victims is increasing