esakal | रेमडेसिवर’चा काळाबाजार करणाऱ्यांवर छापे 
sakal

बोलून बातमी शोधा

sakal impact

जिल्ह्यातील सर्व औषधी मालाचे किरकोळ व ठोक व्यापारी/दुकानदार यांनी त्यांच्याकडून विकल्या जाणा-या प्रत्येक औषधींची लेखी पावती (बील) प्रत्येक ग्राहकास देणे बंधनकारक आहे. 

रेमडेसिवर’चा काळाबाजार करणाऱ्यांवर छापे 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यातील कोविड-१९ या विषाणूच्या संसर्गासंदर्भातील औषधांचा काळाबाजार, साठेबाजी करणा-यांविरुध्द कारवाई करण्याचे अधिकार आता जळगाव जिल्ह्यातील सर्व इंन्सिडंट कमांडर यांना प्रदान करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. ‘सकाळ’ने आजच्या अंकात ‘रेमडेसिवर इंजेक्शनचा जिल्ह्यात काळाबाजार’ असे वृत्त प्रकाशीत केले होते. त्याची दखल घेत हे आदेश देण्यात आले आहेत. 

अचानक पडणार धाडी
कोविड विषाणूच्या संसर्गासंदर्भातील औषधांचा काळाबाजार, साठेबाजी करणा-या होलसेल, किरकोळ औषध विक्रेते, डॉक्टर्स, रुग्णालये व अन्य इतर संबंधित आस्थापना यांच्याविरुध्द सापळा रचून अथवा अचानक धाडी टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व इंन्सिडंट कमांडर व संबधित कार्यक्षेत्रातील पोलीस अधिकारी/कर्मचारी यांनी संबंधित ठिकाणी औषधांचा काळाबाजार अथवा साठेबाजी होते अगर कसे, याची खात्री करावी. संबंधित ठिकाणी औषधाची साठेबाजी, काळाबाजार होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याच्याबाबतची सविस्तर माहिती सर्व इंन्सिडंट कमांडर व संबंधित कार्यक्षेत्रातील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या औषधी निरीक्षकांना तात्काळ द्यावी. 

जिल्ह्यात नमूद केल्याप्रमाणे जर कोणी कोविड -१९ शी संबंधित औषधांचा काळाबाजार, साठेबाजी करीत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर भारतीय दंड विधान कलम ४२० जीवनावश्यक वस्तू कायदा, १९५५ परिच्छेद २६ Drugs Price Control Order २०१३ जीवनाश्यक वस्तू कायदा कलम ३ (२) (C) नुसार संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई औषध निरीक्षक यांनी तात्काळ करावी. जिल्ह्यातील सर्व औषधी मालाचे किरकोळ व ठोक व्यापारी/दुकानदार यांनी त्यांच्याकडून विकल्या जाणा-या प्रत्येक औषधींची लेखी पावती (बील) प्रत्येक ग्राहकास देणे बंधनकारक आहे. 

तर शिक्षेस पात्र
या आदेशाचे उल्लंघन केल्यास ही बाब भारतीय दंड संहिता १८६० (४५) चे कलम १८८ आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५१ ते ६० तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. असेही जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण राऊत यांनी आदेशात म्हटले आहे.