कोरोनाच्या नावाखाली लूट...आदिवासी गाव-पाड्यांवर बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट !

कोरोनाच्या नावाखाली लूट...आदिवासी गाव-पाड्यांवर बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट !

चोपडा  : शहरासह तालुक्यातील आदिवासी भागातील गाव-पाड्यांवर बोगस  डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असून, ते कोरोनाच्या संकटात नको त्या रुग्णांवर उपचार करून अव्वाच्या सव्वा पैसे उकळत आहेत. या प्रकाराबाबत आरोग्य विभागच अनभिज्ञ असून, झोपेचे सोंग घेतल्याची भूमिका वठवित असल्याने रुग्णांच्या जिवाशी अक्षरश: खेळ सुरू आहे. 

चोपडा शहराच्या अनेक भागात कानाकोपऱ्यांत, तसेच तालुक्याच्या आदिवासी गावांमध्ये वाड्या, वस्त्यांवर आठवड्याचा एक दिवस येऊन अथवा छोट्याशा खोलीत दवाखाना थाटून बोगस डॉक्टर शेकडो रुग्णांची तपासणी करीत आहेत. उत्तर भागातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये आदिवासी पट्ट्यात  बोगस डॉक्टर परिसरातील चार ते पाच गावांत बिनबोभाट प्रॅक्टिस करीत आहेत. याकडे आरोग्य विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आदिवासीबांधवांनी केला आहे. काही ठिकाणी बोगस डॉक्टरची बोंबाबोंब झाली असता, त्यांनी आपल्या व्यवसायाचा गाशा गुंडाळला. आदिवासी पट्ट्यात अंमलवाडी, मोरचिडा, गोवऱ्या व उमर्टी या गावांमध्ये बोगस वैद्यकीय व्यवसाय चालत असल्याचे तेथील रहिवाशांनी सांगितले. शहरातील एका खासगी दवाखान्यात काही दिवस कंपाउंडर म्हणून काम करायचे, नंतर स्वतः दवाखाना थाटायचा, असा प्रकार सुरू आहे. 

स्टिरोइड ड्रग्सचा वापर 
रुग्णास त्वरित आराम मिळावा म्हणून हे डॉक्टर सर्रास स्टिरोइड ड्रग्सचा वापर करीत आहेत. जास्त प्रमाणात (हायडोस) औषधीचा वापर करीत असल्याने त्याचा शारीरिक आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. 

आरोग्य केंद्र नाही 
आदिवासी पट्ट्यात जवळपास ३५ ते ३६ खेडी आहेत. वैजपूर येथेच प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. काही आदिवासी गावे लासूर प्राथमिक आरोग्य केंद्रात येतात. सातपुड्यातील दुर्गम भागात दोन हजार ५०० लोकवस्तीचे उमर्टी आदिवासी गाव आहे. येथून २५ किलोमीटर दूर लासूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत हे गाव येते. एवढ्या मोठ्या गावाला आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम रखडले आहे. 

चोपडा तालुक्यात बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. त्यांच्या शोधासाठी पथक नियुक्त केले आहे. 
- अनिल गावित, तहसीलदार, चोपडा  

संपादन- भूषण श्रीखंडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com