चार महिन्यांत प्रथमच रुग्णसंख्या शंभराच्या आत 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 11 October 2020

जळगाव जिल्ह्यात ऑगस्टपर्यंत झपाट्याने वाढलेल्या कोरोना संसर्गात सप्टेंबरच्या उत्तरार्धापासून नव्याने बाधितांची रुग्णसंख्या कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे.

जळगाव : महिनाभरापासून कोरोनाचा संसर्ग नियंत्रित झाल्याचे दिसत आहे. गेल्या चार महिन्यांत रविवारी प्रथमच रुग्णसंख्या शंभराच्या आत राहिली. दिवसभरात अवघ्या ७६ रुग्णांची नोंद झाली, तर दुसरीकडे ४३८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. जिल्ह्यातील मृत्यूसत्र मात्र सुरुच असून रविवारीही एका १४ वर्षीय मुलीसह ५ रुग्णांचा बळी गेला. 
जळगाव जिल्ह्यात ऑगस्टपर्यंत झपाट्याने वाढलेल्या कोरोना संसर्गात सप्टेंबरच्या उत्तरार्धापासून नव्याने बाधितांची रुग्णसंख्या कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. १७ सप्टेंबरपासून सातत्याने रुग्णसंख्या घटत असून बरे होणाऱ्या रुग्णांच्या सख्येत मोठी वाढ होत आहे. 

चार महिन्यातील निचांक 
जूनपासून आतापर्यंतच्या गेल्या चार महिन्यांत दररोज आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येत आतापर्यंतचा निचांकी आकडा रविवारी नोंदला गेला. रविवारी प्राप्त अहवालात अवघे ७६ नवे बाधित आढळून आले असून त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ५१ हजारांवर पोचली आहे. तर ४३८ रुग्णांना रविवारी घरी सोडल्यानंतर बरे झालेल्यांचा आकडाही ४७हजार १५३ झाला आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या अवघी २६२२ असून बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९२.४५ टक्क्यांवर पोचले आहे. 

मृत्यूसत्र सुरुच 
असे असले तरी जिल्ह्यातील मृत्यूसत्र अद्याप सुरुच आहे. आजही १४ वर्षीय मुलीसह पाच जणांचा कोरोनामुळे बळी गेल्यामुळे एकूण बळींचा आकडा १२२६ झाला आहे. हे प्रमाण २.४० टक्के आहे. प्रशासनाने प्रयत्न करुनही मृत्यूदर १ टक्क्यापर्यंत येऊ शकलेला नाही. 

असे आढळले रुग्ण 
जळगाव शहर ८, जळगाव ग्रामीण १, भुसावळ ११, [मळनेर ११, चोपडा १३, पाचोरा २, भडगाव २, यावल ९, एरंडोल २, रावेर १, जामनेर ३, पारोळा १०, चाळीसगाव २, बोदवड १. मुक्ताईनगर व धरणगाव येथे एकही रुग्ण आढळून आला नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon coronavirus first time under hundred patient last four month