
सप्टेंबरच्या १७ तारखेनंतर सातत्याने नव्या कोरोना बाधितांचा आकडा घटत असून संसर्गाचा आलेखही खाली येत आहे.
जळगाव : कोरोना संसर्गात जिल्ह्याच्या दृष्टीने रविवारचा दिवस सर्वाधिक दिलासादायक ठरला. नव्या बाधितांमध्ये गेल्या चार महिन्यांतील सर्वाधिक निचांकी आकड्याची नोंद आज झाली. जिल्ह्यात दिवसभरात केवळ ३८ रुग्ण आढळून आले, तर ८६ बरे झाले.
जळगाव जिल्ह्यात मे- जूनपासून वाढलेला कोरोनाचा संसर्ग सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये नियंत्रणात येत असल्याचे चित्र दिसत आहे. सप्टेंबरच्या १७ तारखेनंतर सातत्याने नव्या कोरोना बाधितांचा आकडा घटत असून संसर्गाचा आलेखही खाली येत आहे. जगात काही ठिकाणी कोरोनाची दुसरी लाट आली आहे. यामुळे कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत जात आहे. परंतु, जळगाव जिल्ह्यासाठी सध्या तरी दिलासादायक चित्र आहे.
ॲक्टीव रूग्णही घटले
चार महिन्यांत दिवसभरात बाधित नव्या रुग्णांच्या सर्वांत कमी म्हणजे अवघ्या ३८ रुग्णांची नोंद रविवारी (ता.१) झाली. त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा ५३ हजार २३१वर पोचला. तर ८६ रुग्ण बरे झाल्याने एकूण बरे होणाऱ्यांची संख्या वाढून ५१ हजार १७२ झाली असून हे प्रमाण तब्बल ९६.१३ टक्के आहे. गेल्या २४ तासांत केवळ एका रुग्णाचा बळी गेला. ॲक्टीव रुग्णसंख्याही आठशेच्या आत असून त्यापैकी तब्बल पाचशे रुग्ण लक्षणे नसलेले आहेत.
असे आढळले रुग्ण
जळगाव शहर १८, जळगाव ग्रामीण १, भुसावळ १, अमळनेर १, चोपडा २, धरणगाव १, यावल १, जामनेर ४, रावेर ६, चाळीसगाव २, बोदवड १.