जळगावातील ४२ कोटींच्या निधीतील कामांचा मार्ग मोकळा 

सचिन जोशी
Friday, 22 January 2021

महापालिकेने संयुक्त खात्यात निधी वर्ग करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने आवश्यक पत्र द्यावे, यासाठी महापौर भारती सोनवणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती.

जळगाव : शहरातील विकासकामांसाठी आलेल्या ४२ कोटींच्या कामाचे कार्यादेश मक्तेदाराला देण्यात आले असून, महापालिकेने आपल्या हिश्श्‍याची रक्कमही स्वतंत्र खात्यात वर्ग केली आहे. त्यामुळे ४२ कोटींच्या निधीतील कामांचा मार्ग मोकळा झाला आहे. 
दरम्यान, संपूर्ण कामे करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व जळगाव महापालिकेचे संयुक्त खाते उघडणे आवश्यक आहे. महापालिकेने संयुक्त खात्यात निधी वर्ग करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने आवश्यक पत्र द्यावे, यासाठी महापौर भारती सोनवणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. महापौरांच्या भेटीनंतर सार्वजनिक विभागाने महापालिकेला शुक्रवारी (ता. २२) याबाबत पत्र दिले. 

तांत्रिक कारणास्‍तव होती स्‍थगिती
शहरातील विकासकामांसाठी सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेंतर्गत ४२ कोटींची कामे मंजूर करण्यात आली होती. तांत्रिक कारणास्तव कामांना स्थगिती देण्यात आली होती. गेल्या आठवड्यात सर्व कामांची स्थगिती हटवून मक्तेदाराला कार्यादेश देण्यात आले. महापौर व शिष्टमंडळाने घेतलेल्या भेटीनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने महापालिका आयुक्तांना याबाबत पत्र पाठविले असून, शासन निर्णयानुसार निधी उपलब्ध करून देण्याचे सुचविले आहे. महापालिकेकडून पुढील कार्यवाही लवकरात लवकर करण्यात येणार असून, त्यानंतर कामाला प्रत्यक्ष सुरवात होणार असल्याची माहिती महापौरांनी दिली. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corporation 42 ccrrore fund in working permmition