सफाईच्या मक्‍त्यावरून जळगावच्या भाजप नगरसेवकांत फूट? 

कैलास शिंदे
शनिवार, 4 जुलै 2020

जळगाव महापालिकेत सफाईचा मक्ता वॉटरग्रेस कंपनीला दिला होता. मात्र, हा मक्ता रद्द करून स्थानिक पातळीवर कांतिलाल उखा वाघ यांना देण्यात आला. याबाबत स्थायी समितीत ठराव मंजूर करून हा मक्ता सुरूही करण्यात आला.

जळगाव : महापालिकेत सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांत शुक्रवारी (ता. 3) उघड मतभेद दिसून आले. सफाई मक्‍त्याच्या निविदेवरून हा वाद झाला आहे. पक्षाच्या नगरसेवकांच्या एका गटाने स्थायी समिती सभापतींकडे नवीन दिलेल्या मक्‍त्याबाबत शंका उपस्थित केली. या संदर्भात आयुक्तांनी स्थायी समिती सभापती, महापौर, भाजप नगरसेवक व तक्रारदार नगरसेवकांची बैठक घेतली. मात्र, तक्रारदार नगरसेवकांनी लेखी तक्रार दिली. त्यावर खुलासा करा, असे सांगून बैठकीस उपस्थित राहण्यास नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे. 
जळगाव महापालिकेत सफाईचा मक्ता वॉटरग्रेस कंपनीला दिला होता. मात्र, हा मक्ता रद्द करून स्थानिक पातळीवर कांतिलाल उखा वाघ यांना देण्यात आला. याबाबत स्थायी समितीत ठराव मंजूर करून हा मक्ता सुरूही करण्यात आला. मात्र, सत्ताधारी भाजपच्याच नगरसेवकांनी नवीन मंजूर केलेल्या मक्‍त्याबाबत आक्षेप घेतला व याबाबत स्थायी समिती सभापती ऍड. शुचिता हाडा यांना पत्र दिले. यात त्यांनी म्हटले आहे, की वॉटरग्रेस कंपनीचा मक्ता पूर्णपणे रद्द केलेला नाही. त्यामुळे हा नवीन दिलेला मक्ता कायदेशीर कसा होऊ शकतो, या मक्‍त्यासाठी दोन निविदा आलेल्या असताना, त्या उघडलेल्या नाहीत. त्यात तिसऱ्याच निविदेला मंजुरी कशी देण्यात आली, असे अनेक मुद्दे त्यांनी उपस्थित केले आहेत. 

बैठकीत तक्रारीचा सूर 
स्थायी समिती सभापती ऍड. शुचिता हाडा यांनी आयुक्तांना या संदर्भात माहिती दिली. तसेच पक्षातर्फे तक्रारदार नगरसेवकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी आयुक्तांकडे भाजपच्या स्थायी समितीतील तक्रार नगरसेवक तसेच भाजपच्या नगरसेवकांची बैठक घेतली. या वेळी तक्रारदार नगरसेवकांनाही पाचारण करण्यात आले होते. हे तक्रारदार नगरसेवक महापालिकेत उपस्थित होते. भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूयवंशी यांनी या नगरसेवकांना बैठकीला चालण्याबाबत सांगितले, परंतु या नगरसेवकांनी नकार दिला. ऍड. हाडा, महापौर भारती सोनवणे तसेच काही स्थायी समितीच्या पक्षाच्या नगरसेवकांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. त्यांच्यासमोर तक्रारीची सर्व माहिती मांडली. त्या वेळी आयुक्तांनी सांगितले, की स्थायी समितीचा अजेंडा प्रसिद्ध झाला. त्यात सर्व माहिती दिली आहे. त्यानुसार हा मक्ता मंजूर केला आहे. 

चौघांचा विरोध 
आयुक्तांनी नवीन दिलेल्या सफाई मक्‍त्याबाबत खुलासा केला असला, तरी तक्रारदार नगरसेवकच उपस्थित नसल्यामुळे त्यांच्या शंकांचे निरसन कसे होणार, हाच प्रश्‍न आहे. त्यामुळे नवीन मक्‍त्यावरून भाजपच्या नगरसेवकांत उभी फूट पडली असल्याचे दिसून येत आहे. यात तक्रारदार तथा भाजपचे गटनेते भगत बालाणी, सदाशिवराव ढेकळे, ऍड. दिलीप पोकळे, प्रतिभा देशमुख व नवनाथ दारकुंडे भाजपचे नगरसेवक असल्याचे सांगण्यात येत आहे. 

मतभेद नाहीत : बालाणी 
याबाबत भाजपचे तक्रारदार नगरसेवक भगत बालाणी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की आमचे पक्षात कोणतेही मतभेद नाहीत. आमचा स्थायी समिती सभापतींवरही आक्षेप नाही, आमचा आक्षेप प्रशासनावर आहे. ठरावात कोणतीही अनियमितता राहू नये, यासाठी आम्ही काही शंका सभापतींकडे उपस्थित केल्या. सभापतींनी त्या आयुक्तांना कळविल्या आहेत. आयुक्तांनी त्यावर लेखी खुलास द्यावा. आमचे समाधान झाल्यास आम्ही या ठरावाच्या इतिवृत्तात स्थायी सभेत मंजुरी देऊ, असे त्यांनी म्हटले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corporation bjp member cross safai contract