काय सांगता..जळगाव शहरातील कानाकोपरा होणार स्‍वच्छ

भुषण श्रीखंडे
Thursday, 1 October 2020

शहरात रोगराई पसरू नये यासाठी काटेकोरपणे साफसफाई करण्यासाठी गुरुवारी (ता. १) महापौर भारती सोनवणे यांनी आपल्या दालनात सर्व आरोग्य निरीक्षकांची बैठक घेतली.

जळगाव : महापालिकेच्या आरोग्य, मलेरिया विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी कोविड काळात प्रामाणिकपणे काम केले आहे. रोगराई टाळण्यासाठी आपण स्वतःची काळजी घेत शहरात स्वच्छता राखावी. उद्या (ता. २) महात्मा गांधी जयंतीपासून शहरातील सर्व परिसराचा कानाकोपरा कसा स्वच्छ ठेवता येईल, यासाठी प्रत्येकाने कामाला लागावे, अशा सूचना महापौर भारती सोनवणे यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. 
शहरात रोगराई पसरू नये यासाठी काटेकोरपणे साफसफाई करण्यासाठी गुरुवारी (ता. १) महापौर भारती सोनवणे यांनी आपल्या दालनात सर्व आरोग्य निरीक्षकांची बैठक घेतली. बैठकीला नगरसेवक कैलास सोनवणे, सदाशिव ढेकळे, उपायुक्त पवन पाटील उपस्थित होते. महापौर म्हणाले, की शहरात आजवर नियमितपणे स्वच्छता होत आहे. मक्तेदाराच्या सफाई कर्मचाऱ्यांवर प्रत्येक आरोग्य निरीक्षकाने लक्ष घालून काम करून घ्यावे. महापालिका कर्मचाऱ्यांनी आपल्याला नेमून दिलेला परिसर स्वच्छ ठेवावा, असे महापौरांनी सांगितले. 

सुरक्षासाधनांचा वापर करावा 
शहरात स्वच्छता करताना प्रत्येकाने मास्क आणि हँडग्लोव्हज वापरणे आवश्यक आहे. प्रत्येकाला मास्क आणि हँडग्लोव्हज उपलब्ध व्हावे यासाठी महापौरांनी आरोग्य विभागाला सूचना देत ५०० मास्क, १००० हँडग्लोव्हज, सॅनिटायझर तत्काळ उपलब्ध करून देण्याचे सांगितले. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corporation mayor bharati sonawane clean city mahatma gandhi jayanti