जगातील कापूस साठ्यात मोठी घट; प्रतिखंडी दर वधारला 

चंद्रकांत जाधव
Sunday, 29 November 2020

चीनमध्ये सुमारे सहा दशलक्ष मेट्रिक टन कापूस साठा होता. चीन, व्हीएतनाम, भारत व बांगलादेशातील वस्त्रोद्योग जोमात सुरू आहे. चीनमधील साठाही संपत आला आहे.

जळगाव : जगातील वस्त्रोद्योग ९५ ते ९७ टक्के क्षमतेने कार्यरत झाला आहे. अर्थातच कापसाची मागणी वाढली असून, विविध देशांना बसलेल्या फटक्याने २०१९-२० मध्ये शिल्लक असलेल्या कापसाचा मोठा वापर सुरू आहे. एकट्या भारतात सुमारे १०० लाख गाठी (एक गाठ १७० किलो रुई) एवढ्या शिल्लक साठ्यातून फक्त ५० टक्के साठा राहीला आहे. 
चीनमध्ये सुमारे सहा दशलक्ष मेट्रिक टन कापूस साठा होता. चीन, व्हीएतनाम, भारत व बांगलादेशातील वस्त्रोद्योग जोमात सुरू आहे. चीनमधील साठाही संपत आला आहे. चीन सरकार कापसाच साठा (बफर स्टॉक) करते. यंदाही हा साठा करण्याची घोषणा चीनने ऑक्टोबरमध्ये केली असून, भारत, अमेरिकेकडून गाठींच्या खरेदीला सुरवातही केली आहे. 
जगात २१ दशलक्ष मेट्रिक टन एवढा सुरवातीचा कापूस साठा (ओपनींग स्टॉक) होता. हा साठा चीन व भारतात अधिक होता. चीनमध्ये सुमारे सहा दशलक्ष टन कापूस साठा होता. हा साठा तेथे संपत आला आहे. 

चाळीस हजाराच्‍यावर दर
भारतात गेल्या हंगामात शासन किंवा कापूस महामंडळाने सुमारे १२९ लाख गाठींची खरेदी केली. महामंडळाने विक्रीची ऑनलाईन प्रक्रिया उन्हाळ्यात सुरू केली होती. जूनमध्ये खंडिचे दर (३५६ किलो रुई) ३६ हजार ते ३६ हजार ५०० रुपये एवढे होते. जगभरातील घटलेली कापूस लागवड व वाढती मागणी यामुळे कापूस गाठींच्या दरात सुधारणा झाली. सूतगिरण्या सर्वत्र जोमात सुरू झाल्या. सध्या खंडिचे दर ४० हजार ६०० रुपये एवढे आहेत. न्यूयॉर्क वायदमध्ये कापसाचे दर ७१ सेंटवर स्थिर आहेत. 
दुसरीकडे नैसर्गिक आपत्तीमुळे अमेरिका, चीन व भारत या प्रमुख कापूस उत्पादक देशांमध्ये कापूस उत्पादन घटणार आहे. 
दुसरीकडे रुपया डॉलरच्या तुलनेत कमजोर झाला असून, एक डॉलर किमान ७२ रुपयांना पडत आहे. जगात व्यवहार डॉलरमध्ये होतात. या स्थितीत भारतीय कापूस स्वस्त पडत आहे. यामुळे चीन, बांगलादेश व इतर आयातदारांनी भारतीय कापसाच्या खरेदीवर भर दिला आहे. कापूस साठा संपत असल्याने नव्या कापसाचा उठाव वाढला आहे. यामुळे कापसाचे सौदे होत असून, भारत, अमेरिका, ब्राझील आदी निर्यातदार देशांमधील कापूस बाजारात चांगली सुधारणा दिसत आहे. 

भारतातून १२ लाख गाठींची निर्यात 
नवा कापूस हंगाम ऑक्टोबर २०२० मध्ये सुरू झाला आहे. हा हंगाम सप्टेंबर २०२१ मध्ये संपणार आहे. यादरम्यान भारतातून ७० ते ७२ लाख गाठींची निर्यात विविध देशांमध्ये होईल. नव्या हंगामात भारतातून सुमारे १२ लाख गाठींची निर्यात बांगलादेश, चीन, व्हीएतनाम व तुर्कीमध्ये झाली आहे. देशातील निर्यात २० टक्क्यांनी वाढणार आहे. गेल्या हंगामात सुमारे ४० लाख गाठींची निर्यात झाली होती. मागणी वाढल्याने व सौदे सुरूच असल्याने देशांतर्गत बाजारात कापसाचे दर वाढले आहेत. कापूस महामंडळाकडील साठा फक्त ५५ लाख गाठी एवढा राहीला आहे. शिल्लक साठ्याचे संकट दूर होत आहे. यामुळे पुढे देशातील जिनींग प्रेसिंग कारखानेही गतिमान होतील, असे चित्र आहे. 

अमेरिका व चीनमध्ये तणाव दूर होण्याचे संकेत 
अमेरिकेत ट्रंप राष्ट्राध्यक्ष असताना चीन व अमेरिकेत आयात निर्यातीच्या मुद्द्यारून गेले दोन वर्षे तणाव सुरू होता. चीन आपल्याकडे अधिक निर्यात करतो. आपली निर्यातीची तूट वाढत आहे, असा दावा अमेरिका सतत करीत होता. यामुळे चीन व अमेरिकेत व्यापार युद्धही सुरू झाले. अलीकडेच अमेरिकेत सत्तापालट झाली आहे. तेथे जो बायडेन नवे राष्ट्राध्यक्ष झाल्याने हे व्यापार युद्ध दूर होईल, अशी अपेक्षाही कापूस जगतातून व्यक्त होत आहे. सध्या चीन व अमेरिकेतील कापसाचा व्यापार पूर्ववत होत असल्याची माहिती मिळाली. चीन अमेरिकन कापसाचा सर्वात मोठा खरेदीदार आहे. चीन यंदा किमान १०० लाख गाठींची आयात जगभरातून करणार आहे. 

जगात कापूस साठ्याचे संकट दूर होत आहे. कारण वस्त्रोद्योगाने गती घेतली आहे. कापूस गाठींच्या दरात चांगली वाढ गेल्या पंधरवड्यात झाली आहे. भारताची कापूस निर्यात यंदा २० टक्क्यांनी वाढणार असून, नव्या हंगामात १२ लाख गाठींची निर्यातही झाली आहे. 
- अरविंद जैन, सदस्य, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (पीक समिती) 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon cotton large decline in cotton stocks