
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा पूर्ण आढावा घेतल्यानंतर राज्याचे वैद्यकीय संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्याशी वेळोवेळी केलेल्या चर्चेनंतर जिल्हाधिकारी व प्रशासक यांच्याकडे प्रस्ताव दिला होता.
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे पूर्वीप्रमाणे कोरोना व्यतिरिक्त (नॉन कोविड) इतर सेवा सुरु होणार आहेत. याची सुरवात गुरूवारपासून (१७ डिसेंबर) होत आहे. कोरोना रूग्णांच्या सेवेसाठी अविरत सेवा दिल्यानंतर सिव्हीलची ओपीडी सात महिन्यानंतर सुरू करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे प्रशासक डॉ. बी. एन. पाटील, अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार उपस्थित होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव हे कोरोनाव्यतिरिक्त (नॉन कोविड) इतर सेवा सुरु करण्यासाठी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली १ डिसेंबरपासून सर्व डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी, परिचारिका परिश्रम घेत आहेत. त्याचाच भाग म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे राज्यातील आदर्श रुग्णालय बनविण्याच्या दृष्टीने देखील वाटचाल सुरु आहे. गेल्या १६ दिवसांपासून महाविद्यालयातील विविध भागात नवनवीन बदल घडून येत आहेत.
प्रस्तावास मंजुरी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा पूर्ण आढावा घेतल्यानंतर राज्याचे वैद्यकीय संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्याशी वेळोवेळी केलेल्या चर्चेनंतर जिल्हाधिकारी व प्रशासक यांच्याकडे प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर आता 17 डिसेंबरपासून नॉन कोविड सुविधा जिल्ह्यातील नागरिकांना सुरू होत आहेत.
ओपीडी झाली सुलभ
रुग्णांना वैद्यकीय सेवा तातडीने मिळावी, त्याचा वेळ वाचला; या दृष्टीने मुख्य गेटच्या आवारातील वाहन पार्किंग काढून तेथे केसपेपर देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथे महिला, पुरुष, दिव्यांग यांच्यासाठी ४ टेबलची सुविधा करण्यात आली आहे. केसपेपर निघाला कि त्याच्या समोरील बाजूस वैद्यकीय सेवेसाठी तो आत जाईल. त्याला आवश्यक सेवा मिळाली कि तो लवकर घरी गेला पाहिजे अशा प्रकारचे व्यवस्थित नियोजन याठिकाणी डॉक्टर्स, परिचारिका, कक्षसेवक, कर्मचाऱ्यांचे करण्यात आले आहे. तसेच वैद्यकीय कर्मचारी वर्ग पुरेसा आहे. औषधींची कमतरता नाही. गंभीर रुग्णांसाठी व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. तसेच ऑक्सिजन टॅंकची उभारणी करण्यात आली आहे.