लग्‍नात दारू पिण्यावरून वाद; थेट डोक्‍यात फोडली बाटली

रईस शेख
Monday, 4 January 2021

दारूसाठी पैशांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याने चौघांनी राकेशला शिवीगाळ करून मारहाण केली.

जळगाव : पिंप्राळ्यातील गणपतीनगरात लग्नाच्या कार्यक्रमात दारू पिण्यावरून वादाला सुरवात झाली. एका तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून जखमी केल्याने तुंबळ हाणामारी झाली. रामानंदनगर पोलिसांत चौघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. 
गणपतीनगर पिंप्राळा येथील राकेश कुंभार (वय २५) हा मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो. शनिवार (ता. २) रात्री नऊला त्यांच्या घरासमोर लग्न असल्याने नाचण्याचा कार्यक्रम सुरू होता. राकेश कुंभार हा घरच्या ओट्यावर बसून कार्यक्रमाचा आनंद घेत होता. मात्र, लग्नात नाचणारे राकेश जाधव (वय २५, रा. मळी चौक) व गंप्या, वण्या (पूर्ण नाव माहीत नाही) (दोन्ही रा. बौद्धवाडा) आणि योगेश पाटील चायनिजवाला (रा. गणपतीनगर, पिंप्राळा) यांनी राकेश कुंभारला गाठून त्याच्याकडून दारूसाठी पैशांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याने चौघांनी राकेशला शिवीगाळ करून मारहाण केली. यात राकेश जाधवने त्यांच्या हातातील बिअरची बाटली राकेश कुंभारच्या डोक्यात मारल्याने तो जखमी झाला होता. 

गळ्यातील चैन ओढली 
राकेशच्या डोक्यात बिअर बॉटल फोडल्यानंतर धाक दाखवत खिशातील ५०० रुपये, गळ्यातील ३० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन हिसकावून घेतली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी करीत आहेत.  

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon crime news argument over drinking alcohol in marriage