बापरे..एटीएमकार्ड ‘क्लोन’द्वारे चारशे कोटी लुटीचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
Friday, 16 October 2020

हॅकर मनीष भंगाळे याने २०१६मध्ये माजी मंत्री एकनाथराव खडसेंनी दाऊदच्या पत्नीशी फोनद्वारे संवाद साधल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली होती.

जळगाव : देशभरातील विविध ठिकाणच्या खातेदारांचा एटीएम कार्डसह बँकखात्यांचा डाटा मिळवून त्या माध्यमातून चारशे कोटी रुपयांच्या ऑनलाईन चोरीच्या प्रयत्नातील टोळीचा जिल्हा पोलिस पथकाने पर्दाफाश केला. त्यामुळे शेकडो ग्राहकांच्या खात्यातील कोट्यवधींची लूट होण्यापासून वाचली. हॅकर मनीष भंगाळे याला माफीचा साक्षीदार बनवून केलेल्या कारवाईत पोलिसांनी दोघांना अटक केली असून अन्य संशयितांचा तपास सुरु आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

या टोळीतील मुख्य संशयित हेमंत ईश्‍वरलाल पाटील (वय ४२) रा. भुरे मामलेदार प्लॉट, शिवाजीनगर व बांधकाम ठेकेदार मोहसीन खान ईस्माईल खान (वय ३५) रा देवपूर, धुळे या दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. आणखी देशभरातील विविध ठिकाणच्या सात संशयितांची नावे निष्पन्न झाली असून त्यांच्या शोधार्थ तीन ते चार पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहे. 

कोट्यवधींची रक्कम वाचली 
संशयितांकडून मिळालेल्या विविध बँक खातेदारांच्या डाटाचा रक्कमेचा विचार केला तरी अब्जावधीची रक्कम पोलिसांच्या सतर्कतेमुळे व वेळीच अभ्यासपूर्ण तपासामुळे चोरी होण्यापासून सुरक्षित राहिली आहे. या घटनेने देशभरात एकच खळबळ उडाली असून बँकेचा डाटा खरच सुरक्षित आहे का? असाही प्रश्‍न आता उपस्थित होत आहे. 
 
सात संशयितात बँक मॅनेजरही 
या गुन्ह्यात आणखी देशभरातील विविध ठिकाणचे सात संशयित निष्पन्न झाले असून त्यांना ताब्यात घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहे. टोळीत नाशिकमधील एक बँक मॅनेजरचाही यात सहभाग असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. या प्रकरणाच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांना न्यायालयात हजर केले असताख दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. 
 
खडसेंना अडचणीत आणणारा भंगाळे 
यातील हॅकर मनीष भंगाळे याने २०१६मध्ये माजी मंत्री एकनाथराव खडसेंनी दाऊदच्या पत्नीशी फोनद्वारे संवाद साधल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली होती. अर्थात, या प्रकरणात अवघ्या दोन दिवसांत चौकशी करुन खडसेंना क्लीन चीट मिळाळी होती. भंगाळेला या प्रकरणात अटकही झाली होती. तेव्हापासून भंगाळे प्रकाशझोतात आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon cyber crime atm card clone and four hundred crore tray robbery