रावणदहन होणार; पहा यू-ट्यूब, फेसबुकवर लाइव्ह 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 24 October 2020

विजयादशमीला रावणदहनाची परंपरा आहे. जळगाव शहरातही अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. सात वर्षांपूर्वी पंचमुखी हनुमान व्यायामशाळेतर्फे हा उत्सव साजरा केला जायचा. त्यानंतर ही धुरा एल. के. फाउंडेशनने सुरू ठेवली.

 

 

जळगाव : सात वर्षांपासून सुरू असलेली एल. के. फाउंडेशनची रावणदहनाची परंपरा यंदाही कायम राहणार आहे. यंदा कोरोनामुळे त्यासंबंधी सर्व प्रोटोकॉल पाळून रावणदहन होईल. त्याचे लाइव्ह प्रक्षेपण कोरोनासंबंधी सर्व नियमावली पाळून हा सोहळा साजरा होणार आहे. 
दर वर्षी विजयादशमीला रावणदहनाची परंपरा आहे. जळगाव शहरातही अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. सात वर्षांपूर्वी पंचमुखी हनुमान व्यायामशाळेतर्फे हा उत्सव साजरा केला जायचा. त्यानंतर ही धुरा एल. के. फाउंडेशनने सुरू ठेवली. दर वर्षी मेहरूणच्या चौपाटीवर हा उत्सव हजारोंच्या जनसमुदायात साजरा होतो. यंदा कोरोनाची स्थिती असताना रावणदहनाची परंपरा कायम राहील काय, याबाबत प्रश्‍नचिन्ह होते. मात्र, यंदाही ही परंपरा साजरी होणार आहे. 

असे असेल स्वरूप 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने रावणदहनाबाबत काही दिशानिर्देश दिले आहेत. ते पाळून यंदाचा रावणदहन सोहळा साजरा होणार आहे. शिरसोली मार्गावरील रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर रावणदहन होईल. पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, आमदार राजूमामा भोळे, महापौर भारती सोनवणे यांच्यासह काही मर्यादित प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडेल. 
 
शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रावणदहनाबाबत दिशानिर्देश दिले असून, ते सर्व पाळून हा उत्सव साजरा करण्यात येईल. त्यासाठी पोलिस व जिल्हा प्रशासनाची परवानगी मागितली आहे. ती उद्यापर्यंत मिळेल. हा संपूर्ण सोहळा विविध फेसबुक पेज, यू-ट्यूब चॅनलवर जळगावकरांसाठी लाइव्ह दाखविण्यात येईल. 
- ललित कोल्हे (माजी महापौर तथा अध्यक्ष, एल. के. फाउंडेशन) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon dasara ravan dahan live program you tube and facebook