महामार्ग चौपदरीकरणातून दहा किलोमीटरचा टप्पा वंचित 

सचिन जोशी
Saturday, 28 November 2020

नवापूर- धुळे- जळगाव- मलकापूर- अमरावती असा हा संपूर्ण महामार्ग चौपदरी होत असताना या दहा- बारा किलोमीटरच्या टप्प्याचेच काम तेवढे राहून जात आहे. 

जळगाव : महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणात फागणे- तरसोद व तरसोद- चिखली अशा दोन टप्प्यांत काम होत आहे. जळगाव शहरातून जाणाऱ्या मार्गाचेही खोटेनगर ते कालिंकामाता चौकदरम्यान विस्तार होत असताना पाळधी ते खोटेनगर व पुढे कालिंकामाता ते तरसोद या जवळपास दहा-बारा किलोमीटरचे दोन टप्पे वंचित राहत आहेत. दुर्दैवाने या दोन्ही टप्प्यांतील कामांची जबाबदारी ना महामार्ग प्राधिकरण घ्यायला तयार आहे, ना सार्वजनिक बांधकाम विभाग. 

आवश्य वाचा-  पुन्हा सत्ता न आल्यामुळे फडणवीस अस्वस्थ - ॲड. यशोमती ठाकूर 
 

महामार्ग क्रमांक सहाच्या धुळे- जळगाव जिल्ह्यातील चौपदरीकरणाच्या कामात फागणे- तरसोद व तरसोद- चिखली असे दोन टप्प्यांत काम होत आहे. यापैकी तरसोद- चिखली टप्प्यातील काम वेगात सुरू असून, येणाऱ्या वर्षात हा टप्पा पूर्ण झालेला असेल. तुलनेने फागणे- तरसोद टप्प्याचे काम संथगतीने होत आहे. 

शहरातील चौपदरीकरणही सुरू 
ही दोन्ही कामे होत असताना जळगाव शहरातूनही हा महामार्ग जात असल्याने, वाढते अपघात लक्षात घेऊन विशेष बाब म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी शहरातील महामार्गाच्या चौपदरीकरणाला मंजुरी दिल्यानंतर हे कामही सुरू झाले. मात्र, हे काम केवळ खोटेनगर ते कालिंकामाता चौक या साडेसात किलोमीटरच्या टप्प्यातच होत आहे. 

दोन टप्पे वंचित 
फागणे- तरसोद टप्प्यातील कामात पाळधीपासून महामार्ग बायपास निघून तरसोद फाट्याजवळ हा वळण रस्ता संपतो. त्यामुळे पाळधी ते जळगाव शहरातील खोटेनगर असे जवळपास सहा- सात किलोमीटरचा टप्पा चौपदरीकरणापासून वंचित राहात आहे. हीच स्थिती कालिंकामाता चौक ते तरसोद फाटा या चार किलोमीटरच्या टप्प्याची आहे. नवापूर- धुळे- जळगाव- मलकापूर- अमरावती असा हा संपूर्ण महामार्ग चौपदरी होत असताना या दहा- बारा किलोमीटरच्या टप्प्याचेच काम तेवढे राहून जात आहे. 

आवर्जून वाचा- मुलगा हुतात्‍मा झाला..आईची नजर अंतिम दर्शनाच्या वाटेकडे

रस्ता कुणाची जबाबदारी? 
राष्ट्रीय महामार्ग असल्याने या संपूर्ण कामाचे नियोजन महामार्ग प्राधिकरणाने केले. मात्र, आता चौपदरीकरणाचे टप्पे ठरल्यानंतर पाळधी ते खोटेनगर व कालिंकामाता चौक ते तरसोद फाट्यापर्यंतच्या रस्त्याची मालकी कुणाची, असा प्रश्‍न निर्माण होत आहे. महामार्ग प्राधिकरणाच्या दाव्यानुसार हे दोन्ही टप्पे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केले आहेत. दुसरीकडे बांधकाम विभागाने या रस्त्यांच्या केवळ रुंदीकरणाचा प्रस्ताव तयार केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे साडेचारशे किलोमीटरच्या महामार्ग चौपदरीकरणात या दहा किलोमीटरच्या मार्गाला सावत्र वागणूक दिली जात आहे. या रस्त्याच्या चौपदरीकरणाची जबाबदारी नेमकी कुणाची, असा प्रश्‍नही त्यानिमित्ताने निर्माण झाला आहे. 

या दोन्ही टप्प्यांतील रस्ता अवर्गीकृत केल्यानंतरच आमच्या विभागाकडे त्याची जबाबदारी येईल. त्याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव तयार असून, रस्ता वर्गीकृत झाल्यानंतर रस्त्याच्या कामाबाबत प्रक्रिया राबविण्यात येईल. 
-प्रशांत सोनवणे 
अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग 

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon deprived of ten km stage from highway quadrangle