पुन्हा सत्ता न आल्यामुळे फडणवीस अस्वस्थ - ॲड. यशोमती ठाकूर 

कैलास शिंदे
Saturday, 28 November 2020

महाविकास आघाडी सरकारचा एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. वर्षभरात सरकारने खूप चांगले काम केले आहे. ‘कोविड’शी मुकाबला केला आहे.

जळगाव : राज्यात आपली पुन्हा सत्ता येईल, असे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना वाटत होते; परंतु त्यांना ती संधी मिळाली नसल्यामुळे त्यांना ते सहन होत नाही. त्यामुळे ते सरकारवर टीका करीत असून, हे सरकार पडेल, असे सारखे म्हणत आहेत, अशी टीका राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री व काँग्रेसच्या नेत्या ॲड. यशोमती ठाकूर यानी केली. जळगाव येथे त्या पत्रकारांशी बोलत होत्या. 

त्या म्हणाल्या, की महाविकास आघाडी सरकारचा एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. वर्षभरात सरकारने खूप चांगले काम केले आहे. ‘कोविड’शी मुकाबला केला आहे. अनेकांचे जीव वाचविले आहेत. मात्र विरोधी भारतीय जनता पक्षाने वर्षभर केवळ राजकारण केल आहे. सरकार स्थापन झाल्याच्या पहिल्या दिवसापासून हे सरकार पडणार, असे ते सातत्याने म्हणत आहेत. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस तर सरकार पडण्याबाबत नेहमीच बोलत असतात. भाजपचे सरकार पुन्हा येण्याची त्यांनी अपेक्षा होती; त्यांना ही संधी पुन्हा मिळाली नाही, त्यामुळे त्यांना या सरकारची चांगली कोणतीही गोष्ट सहन होत नाही. 

मुख्यमंत्री मोठ्या मनाचे 
राज्यातील सरकारला एक वर्षे पूर्ण झाल्याबाबत त्या म्हणाल्या, राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. मात्र अत्यंत चांगल्या पद्धतीने हे सरकार काम करीत आहे. जनतेच्या हिताचा विचार हे सरकार करीत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मोठ्या मनाचे आहेत. ‘कुटुंबप्रमुख’म्हणून ते जबाबदारी अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडीत आहेत. 

केंद्राकडून सहकार्य नाही 
केंद्रातील शासनावर टीका करताना त्या म्हणाल्या, की केंद्रातील शासन राज्यातील सरकारला कोणत्याही प्रकारचे सहकार्य करीत नाही. कोविड काळातही केंद्राने कोणत्याही प्रकारचे सहकार्य राज्य सरकारला केलेले नाही. 

खडसेंमुळे आघाडी सशक्त 
माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाबाबत त्या म्हणाल्या, की खडसे हे अभ्यासू नेते आहेत. विधिमंडळात ते तीन-तीन तास अभ्यासपूर्ण भाषण करीत असतात. मात्र अशा चांगल्या नेत्यांचीही भाजपला किंमत कळली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केल्यामुळे महाविकास आघाडीचे ते घटक झाले आहेत. त्यामुळे आघाडी सशक्त झाली आहे. 
 

 संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon fadnavis is upset that he has not returned to power said by minister yashomati thakur