रात्रीचा थरार..वाळूमाफियांचे पोलिसांवर डंपर; भाजप नगरसेवकासह बारा जणांवर गुन्हा 

रईस शेख
Thursday, 26 November 2020

किरकोळ जखम वगळता दुखापत झाली नाही. हे डंपर तहसील कार्यालय धरणगाव येथे जमा करण्यात आले.

जळगाव : बांभोरी (ता.धरणगाव) गिरणा नदी पात्रात पहाटे वाळूमाफियांच्या जत्रेवर पोलिस पथकाने हल्लाबोल केला. या वेळी पेालिसांच्या अंगावर सुसाट डंपर घालून मारण्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी एकूण १२ संशयितांविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा, तर ठेकेदार तथा भाजप नगरसेवक कुलभूषण पाटील यांच्यावर संघटित गुन्हेगारीसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दोन दिवसापूर्वीच गिरणा नदी पात्रात उतरुन परिस्थितीचा आढावा घेत कठोर कारवाईचे संकेतही दिले होते. गौण खनिजाचा अवैध उपसा आणि गुन्हेगारीचा बिमोड करण्याच्या सुचनेवरुन पोलिस अधीक्षक आणि अप्पर पोलिस अधीक्षक सचिन गोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र रायसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, विनोद संदांशिव, मिलिंद सोनार, प्रवीण पाटील, वसंत कोळी, होमगार्ड सुदर्शन पाटील, निखिल चौधरी, तुषार पाटील, राहुल पाटील यांच्या पथकाने पहाटेच वाळू माफियांच्या टोळीवर हल्लाबोल करत अचानक कारवाई केली. 

५ डंपर जप्त, १२ जणांवर गुन्हा 
ट्रॅक्टर- ट्रॉलीत बसून पहाटे अडीच वाजता पोलिस अधिकारी- कर्मचाऱ्यांचे पथक नदीपात्रात उतरले. काहींना संशय आल्याने त्यांनी पळ काढला. मात्र त्यांना डंपर क्र. (एमएच १९ झेड ५४१७) वरील चालक प्रमोद सुभाष चव्हाण (रा.सावदे प्र.चा, ता.एरंडोल), डंपर (एमएच १९ बीएम ७५५७) वरील चालक अनिल योगराज सपकाळे (रा. आव्हाणे ता. जळगाव), डंपर (एमएच १९ झेड ७५५७) वरील चालक भगवान सोमा सोनवणे (रा. बांबोरी प्र.चा धरणगाव), डंपर (एमएच १९ बीएम ५६५६) वरील चालक सचिन शंकर पाटील (रा.शेंदुर्णी ता. जामनेर), डंपर (एमएच २० सिटी ५२४७) वरील चालक सिद्धार्थ अशोक अहिरे (रा.पिंपळकोठा प्र.चा ता.एरंडोल), मोटारसायकल (एमएच १९ २१४७) वरील वॉचर म्हणून काम करणारी दोन मुले मुकुंदा राजू पाटील (रा.वैजनाथ, ता.एरंडोल), दीपक धनराज पाटील (रा. वैजनाथ, ता.एरंडोल) असे मिळून आले. 

पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न 
यातील डंपर चालक सिद्धार्थ अहिरे याने पोलिसांच्या अंगावर डंपर घालून चिरडून मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने पोलिसांनी प्रसंगावधान राखल्याने अनर्थ टळला. किरकोळ जखम वगळता दुखापत झाली नाही. हे डंपर तहसील कार्यालय धरणगाव येथे जमा करण्यात आले. चालकाची चौकशी करता त्यांनी मालकांचे नाव आनंद सपकाळे, बाळू चाटे, उदय राजपूत, सचिन पाटील असे सांगितले. 

भाजप नगरसेवकाचा सहभाग 
या गुन्ह्याच्या फिर्यादीत ठेकेदार कुलभूषण पाटील (रा.जळगाव) याने मला पैसे द्या, मी नदीपात्रातून चोरलेली वाळू माझ्या ठेक्यावरून आणली, असे सांगून तुम्हाला त्याच्या पावत्या देतो असे सांगत सर्वांना एकत्र आणून संघटित गुन्हेगारी करण्यास प्रवृत्त केले असे निष्पन्न झाले असल्याचे म्हटले आहे. 

२५ लाखांचा ऐवज जप्त 
यात १२ संशयितांविरुद्ध धरणगाव पोलिस ठाण्यात भादवि कलम-३०७, ३७९, ५११ सह गौण खनिज खनिज अधिनियम कलम २१ सह कलम २०२/१७७, १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून २५ लाख १८ हजाराचा एकूण ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्यात ५ डंपर १ ब्रास वाळू मोटारसायकल, मोबाईलचा समावेश आहे. यातील पाच चालक व मोटरसायकलवरील दोन पंटर यांना अटक केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक जयपाल हिरे करीत आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon dharangaon police late night girna river valu mafiya action