सव्वा लाख हेक्टरवरील पिकांना अतिपावसाचा फटका 

heavy rain
heavy rain

जळगाव : जिल्ह्यात या वर्षी वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. पूर्ण हंगामात गरजेपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. मात्र, आता आठवडाभरापासून परतीचा जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे खरीप हंगामातील सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. ओल्या दुष्काळाने खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या वर्षी अतिपावसामुळे ज्वारी, बाजरी, मका पिकांच्या निम्म्याहून अधिक म्हणजे सुमारे एक ते सव्वा लाख हेक्टर क्षेत्राला फटका बसला आहे. 
जळगाव जिल्ह्यात या वर्षी जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाला सुरवात झाली. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने थोडा खंड दिला. त्यानंतर पूर्ण सप्टेंबर महिना पावसाने जिल्ह्यात मुक्काम ठोकला. त्यामुळे खरीप हंगामाच्या पहिल्या दोन महिन्यांत येणारे मूग, उडीद या कडधान्य पिकांचे अतोनात नुकसान झाले. जिल्ह्यातील काही तालुक्यांत अतिवृष्टी झाल्याने कडधान्य पिके अक्षरशः जळून गेली. या धक्क्यातून सावरत नाही तोच आता शेतकऱ्यांसमोर दुसरे संकट उभे राहिले आहे. आठवडाभरापासून जिल्ह्यात परतीचा पाऊस सुरू असल्याने ज्वारी, बाजरी, मका पिकांचे नुकसान झाले आहे. जोरदार पाऊस तसेच सकाळच्या वेळी पडणारे धुके यामुळे ज्वारी, बाजरी, मक्याची कणसे काळी पडली आहेत. काही ठिकाणी तर कणसांना कोंब फुटले आहेत. कापणी झालेली कणसेदेखील भिजून कुजली आहेत. पूर्वहंगामी आणि हंगामी कापसाच्या पिकालादेखील पावसाचा फटका बसला आहे. अतिपावसामुळे कापसाची बोंडे कुजली आहेत. बोंडांमधून बाहेर आलेला कापूस भिजून खराब झाला आहे. अनेक शेतांमध्ये वादळामुळे पिके जमीनदोस्त झाली आहेत. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत आले आहेत. शासनाने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून मदत करावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. 
 
कापसाचे पाच लाख हेक्‍टर क्षेत्र
जळगाव जिल्ह्यात सुमारे साडेसात लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामातील पिकांची लागवड होते. त्यात हंगामी आणि पूर्वहंगामी कापसाचे सर्वाधिक साडेचार ते पाच लाख हेक्टर क्षेत्र असते. त्याखालोखाल दीड ते पावणेदोन लाख हेक्टर क्षेत्र ज्वारी, बाजरी, मका पिकांचे असते. या वर्षी अतिपावसामुळे ज्वारी, बाजरी तसेच मका पिकांचे निम्म्याहून अधिक म्हणजे सुमारे एक ते सव्वा लाख हेक्टर क्षेत्राला फटका बसला आहे. 
 
कडधान्ये हातची गेली 
जळगाव जिल्ह्यात सलग चार ते पाच वर्षांपासून सातत्याने दुष्काळ पडत होता. या वर्षी वरुणराजाची चांगली कृपादृष्टी राहिल्याने दुष्काळ धुतला गेला खरा; पण ओल्या दुष्काळाने शेतकरी अडचणीतून बाहेर येऊ शकला नाही. अतिपावसामुळे कडधान्य पिके तर हातची गेलीच आहेत.

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com