जिल्हा रुग्णालयात मशिनरी खरेदीत अफरातफर ?

रईस शेख
Saturday, 21 November 2020

मशिनरी खरेदी करून दोन-तीन वर्षे होऊनही त्या हाताळणाऱ्या तज्ज्ञ व्यक्ती, डॉक्टर उपलब्ध नसताना या मशिनरी खरेदी करून शासनाच्या पैशांचा अपव्यय केल्याचे आढळून आले आहे.

जळगाव  : जिल्हा रुग्णालयात मेमोग्राफी व फेको मशिनसह इतर महागडी वैद्यकीय यंत्रसामग्री खरेदी करताना मोठ्या प्रमाणात अपहार झाला आहे. यासंदर्भात जिल्‍हा शल्यचिकित्सकांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार शिवसेनेचे गजानन मालपुरे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली आहे. 

वाचा- जळगावकर सावधान ः शहरात कोरोनाचे नविन 28 रुग्ण -

मालपुरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे जळगाव जिल्हा रुग्णालयात मॅमोग्राफी मशिन, फेको मशिनसह इतर मशिनरी खरेदी करताना मोठ्या प्रमाणात अपहार झाला आहे. या मशिनरी एकाच व्यावसायिकाकडून खरेदी करण्यात आल्या आहेत. त्यांची बिले घेताना बिलांमध्ये मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे नावसारख्या अत्यावश्यक गोष्टीही नमूद केलेल्या नाहीत. त्यामुळे आम्ही ऑनलाइन मशिनच्या किमती बघितल्या असता जिल्हा ग्रामीण रुग्णालय आणि घेतलेल्या मशिनरीच्या किमती व ऑनलाइन असलेल्या किमतीत प्रचंड तफावत दिसून येत आहे. तरी जिल्‍हा शल्यचिकित्सक नागोजी चव्हाण यांनी खरेदी केलेल्या मशिनरीच्या किमतींमध्ये तफावत असल्यामुळे त्यात मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचे दिसते. या प्रकरणात तज्ज्ञ अभ्यासकांची समिती नेमून मशिनरी खरेदीसाठी व इतर रुग्णांसाठी अत्यावश्यक सर्व बाबींची चौकशी करण्यात यावी.

तालुक्याच्या ठिकाणी मशिनरी खरेदी करून दोन-तीन वर्षे होऊनही त्या हाताळणाऱ्या तज्ज्ञ व्यक्ती, डॉक्टर उपलब्ध नसताना या मशिनरी खरेदी करून शासनाच्या पैशांचा अपव्यय केल्याचे आढळून आले आहे. या सर्व बाबींची सविस्तर चौकशी करून जिल्‍हा शल्यचिकित्सक चव्हाण यांच्यासह दोषी व्यक्तींवर फौजदारी व शासकीय नियमानुसार कारवाई करण्यात यावी. याबाबतचे सविस्तर आणि योग्य ते पुरावे देण्यास आम्ही तयार आहोत, असेही मालपुरे यांनी या तक्रारी अर्जात नमूद केले आहे. दरम्यान, या तक्रारी अर्जाच्या प्रती राज्यपालांसह मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांनाही पाठविण्यात आल्या आहेत. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon district hospital purchasing machinery was corruption